मुंबई : राज्यात मान्सूनपूर्व सरींचा अंदाज, या ८ जिल्ह्यांना आज हवामान खात्याकडून पावसाचा इशारा

मुंबई : मान्सून २०२३ ला सुरुवात होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहे. अशात देशातील अनेक राज्यांना मान्सूनपूर्व पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामानात होणाऱ्या बदलांचा परिणाम राज्यातही पाहायला मिळत असून आता अनेक जिल्ह्यांना मान्सूनपूर्व पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अशात हवामान खात्याकडून आज ८ जिल्ह्यांना विजांचा कडकडाटासह पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे आणि पालघर ही शहरं वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज आहे. महाराष्ट्राच्या जवळपास सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मात्र हवामान कोरडे पाहायला मिळेल. तर इतर जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वारंवार हवामानात होणाऱ्या बदलांमुळे राज्यातील काही ठिकाणी तापमानात घट झाली आहे तर काही जिल्ह्यांमध्ये अद्यापही उकाड्याने नागरिकांना हैराण आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये अंशतः ढगाळ हवामान राहिल. तर दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, १९ मे पासून अंदमान आणि निकोबार बेटांवर अडकलेल्या नैऋत्य मान्सूनने अखेर वेग धरला आहे. १५ जूनपासून देशातल्या बहुतांश भागांमध्ये पावसाला सुरुवात होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. मान्सूनने २२ ते २६ मे या कालावधीत अंदमान आणि निकोबार बेटे ओलांडून पुढे बंगालच्या उपसागरात सरकायला हवे होते. पण हवामानातील बदलांमुळे याला विलंब झाला. पण अखेर आता मान्सून पुढे सरकला आहेत. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, मान्सूनचा हा वेग पाहता केरळमध्ये आणि तामिळनाडूमध्ये १ जूनला तर ५ जूनपर्यंत कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि ईशान्येत मान्सूनला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तर १० जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये पोहू शकतो. १५ जूनपासून गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या बहुतांश भागात मान्सूनचा पाऊस सुरू होईल. राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल आणि जम्मू-काश्मीरमध्ये २० जूनपासून पावसाला सुरुवात होईल तर मान्सूनचा हा टप्पा ८ जुलैपर्यंत सुरू राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *