उंची कमी पण शिक्षणाची गगन भरारी

यवतमाळ : आकांक्षा पुढे गगन ठेंगणे असे म्हणतात पण अडीच फूट उंची असलेल्या मोनिका ने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची परीक्षा देऊन पदवी घेण्याचे मोठे स्वप्न उराशी बाळगले आहे त्याचा अनुभव विद्यापीठाच्या सुरू असलेल्या उन्हाळी परीक्षेच्या दरम्यान गोसी गावंडे महाविद्यालयाच्या अभ्यास केंद्रावर पहावयास मिळाला. उमरखेड तालुक्यातील मोहदरी येथील निवासी शंकर लोखंडे व पंचशीला लोखंडे यांची कन्या मोनिका ही यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत बीए प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. तिचे वय 22 वर्ष असून उंची मात्र अडीच फूट आहे उंची कमी असली तरी शिक्षणाचे ध्येय तिला स्वस्थ बसू देत नव्हते. म्हणून तिने मुक्त विद्यापीठात शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. उन्हाळी परीक्षा मे 2023 मध्ये सुरू झाल्या असून या परीक्षेला ती परीक्षार्थी म्हणून सामोरे जात आहे.

वडिलांचे शिक्षण कमी असल्याने त्यांना पुणे येथे एका कंपनीत सेक्युरिटी गार्ड म्हणून खाजगी नोकरी करावी लागते. घरीही कोरडवाहू जमीन फक्त अडीच एकर त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी वडिलांचे परिश्रम आणि आई सूतगिरणी मध्ये रोज मजुरीवर करत असलेली मेहनत मोनिका आज पर्यंत पाहत आली आहे. शंकर लोखंडे यांना दोन मुले आणि दोन मुली असून विकास आणि आकाश नागपूर येथे राहून उदरनिर्वाह करतात विशेष म्हणजे तेही कलाकार आहेत चित्रपट सृष्टी मध्ये त्यांनी आपल्या नावाचा ठसा उमटविला आहे तर शालू ही मुलगी विवाहित आहे. आता मोनिका घरी असून तिच्या शिक्षणाच्या जिद्दीपुढे वडिलांनी शिक्षणाचा मार्ग मोकळा करून दिला आहे. मोनिकाची उंची कमी असल्यामुळे अनेक नागरिकांनी परीक्षार्थी तिच्याकडे कुतूहलाने बघतात. उंची कमी असून देखील शिक्षणाचे ध्येय असल्यामुळे तिच्यासाठी हे नवखे नाही. मोनिकाची उंची पाहता मोठ्या बेंचवर बसून तिला पेपर सोडविणे कठीण जात असल्यामुळे गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालय परीक्षा केंद्राच्या वतीने तिच्यासाठी लहान बेंचची व्यवस्था करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *