आमदार सुलभाताई खोडके यांच्या प्रयत्नाने सुधारला महापालिका शाळांचा शैक्षणिक दर्जा

  • मनपा शाळांमध्ये नर्सरी, केजी १-२ व इंग्रजी पहिला वर्ग करिता प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
  • मनपा उच्च माध्यमिक शाळा क्र. ८ जमिल कॉलनी येथे अकरावी व बारावीची विज्ञान शाखा

अमरावती ११ जून : अमरावती महानगर पालिकेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्याला घेऊन आ. सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न फळास आले आहे. यंदाच्या शैक्षणिक सत्र २०२३-२०२४ पासून अमरावती महापालिकेच्या आठ उच्च प्राथमिक शाळांमध्ये इयत्ता नववी व दहावीचा वर्ग तसेच जमील कॉलनी येथील मनपा उच्च माध्यमिक शाळा क्र. ८ मध्ये कनिष्ठ महाविद्यालय म्हणजेच इयत्ता अकरावी व बारावीची विज्ञान शाखा प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. तसेच महापालिकांच्या शाळांमध्ये नर्सरी, केजी १, केजी २ व इंग्रजी माध्यमांचा पहिला वर्ग साठी देखील प्रवेश प्रक्रियेला सुरवात झाली आहे.

अमरावती शहरी भागात अनेक खाजगी शाळा सुरु असल्या तरी गरीब व आर्थिक दुर्बल घटकांना महागडे शिक्षण परवडत नसल्याने त्यांना महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घ्यावं लागत. मात्र या शाळांची सुद्धा अत्यंत दयनीय अवस्था झाली असून शैक्षणिक दर्जा सुधारला नसल्याने अनेक विद्यार्थ्यांनी शाळेकडे पाठ फिरविल्याने मोठे शैक्षणिक नुकसान झाले. या संदर्भात अमरावतीच्या आमदार सुलभाताई खोडके यांनी महापालिकेच्या शिक्षण विभागाचा आढावा तसेच प्रत्यक्ष शाळांची पाहणी करून सुधारणा व उपाययोजना बाबत सूचना केल्यात. त्यांनुषंगाने आता महापालिकांच्या शाळांमध्ये नर्सरी, केजी १ – २ तसेच इंग्रजी माध्यमांचा पहिला वर्ग सुरु झाला आहे. अमरावती महापालिका द्वारा संचालित आठ उच्च प्राथमिक शाळांमध्ये स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावर उच्च माध्यमिक शाळा म्हणजेच नववी व दहावीचे वर्ग सुरु करण्यास शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मंजुरी प्रदान केली आहे. ज्यामध्ये मनपा उर्दू शाळा क्रमांक ७ मुजफ्फर पुरा, मनपा उर्दू शाळा क्रमांक ९ नुर नगर, मनपा उर्दू शाळा क्रमांक २ अलीम नगर, मनपा हिंदी शाळा क्र. ११ भाजी बाजार, मनपा मराठी उच्च प्राथमिक शाळा क्र. १४ वडाळी, मनपा मराठी उच्च प्राथमिक शाळा क्र. ६ चपराशी पुरा, मनपा उर्दू उच्च माध्यमिक शाळा क्रमांक १० बडनेरा, मनपा मराठी उच्च प्राथमिक शाळा क्रमांक १३ चपराशी पुरा या आठ शाळांना दर्जावाढ देऊन स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर इयत्ता नववी व दहावीचे वर्ग यंदाच्या शैक्षणीक सत्रापासून सुरु झाले असून प्रवेश प्रक्रिया सुद्धा राबविली जात आहे. तर मनपा उर्दू उच्च माध्यमिक शाळा क्रमांक ८ जमील कॉलनी या ठिकाणी अकरावी व बारावी च्या विज्ञान शाखेकरिता यंदा पासून प्रवेश दिल्या जाणार आहे. सोबत अनेक उर्दू माध्यमांच्या शाळांचा सुद्धा दर्जा सुधारण्यात आला असून त्या ठिकाणी सर्व सुविधा पुरविण्याचा घेऊन शिक्षण विभागाची तयारी सुद्धा जोमात सुरु आहे. तसेच मनपाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळणार असून शिक्षणासोबतच डिजिटल वर्ग, क्रीडा साहित्य, पोषण आहार शिवाय गणवेश, पुस्तके सुद्धा मोफत उपलब्ध होणार आहे. या सुवर्ण संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन अमरावतीच्या आ.सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी केले आहे.

शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगली सुविधा मिळणार – आमदार सुलभाताई खोडके

मनपा उर्दू उच्च माध्यमिक शाळा क्रमांक ८ जमील कॉलनी या ठिकाणी अकरावी व बारावी च्या विज्ञान शाखेकरिता यंदा पासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. शहराच्या पश्चिमी भागात महापालिकेचे कनिष्ठ महाविद्यालय सुरु झाल्याने स्थानिक विद्यार्थ्यांबरोबरच आसपासच्या गावांमधील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध झाली आहे. शहराच्या मध्यभागातील महाविद्यालय त्यांना लांब पडत असल्याने व महागडे शिक्षण अवाक्याबाहेर जात असल्याने आधी या भागातील विद्याथ्यांना शाळा सोडावी लागली. त्यामुळे या भागातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात यावा म्हणून आता अकरावी साठी प्रवेश प्रक्रिया राबविली आहे. तसेच महापालिकांच्या सर्व शाळांचा शैक्षणीक दर्जा सुधारावा व सर्व सोयी-सुविधा आगामी शाळा प्रवेशाच्या वेळीच उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना सुद्धा मनपा शिक्षण विभागाला देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *