आषाढी एकादशी व बकरी ईद च्या पार्श्वभूमीवर सर्व नागरी सुविधा सुरळीत ठेवा-आ.सौ.सुलभाताई

अमरावती २७ जून : महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीत अत्यंत मानाचा समजला जाणारा आषाढी एकादशीचा पर्व तसेच मुस्लिम धर्मियांचा बकरी ईद अर्थात ईद -उल अजहा चा उत्सव एकाच दिवशी म्हणजेच २९ जून रोजी साजरा होणार आहे. राष्ट्रीय एकात्मतेला बळकटी देणारा हा एक दुग्धशर्करा योग असून सर्वसमाज बांधवांना या दिवसाची उत्सुकता लागली आहे. एकाच दिवशी साजऱ्या होणाऱ्या आषाढी एकादशी व बकरी ईद च्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शहरात वीज पुरवठा, पाणी पुरवठा , प्रवासी सेवा , स्वच्छता व आरोग्य सुविधा सुरळीत राहावी , तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणाच्या दृष्टीने सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात याव्यात. अशी सूचना अमरावतीच्या आ.सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी जिल्हा प्रशासनाला केली आहे.
आषाढी एकादशी निमित्य शहराच्या विविध भागात पालखी सोहळे , दिंडी , तसेच धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते . तसेच अनेक वारकरी पंढरपुरात विठू माऊलीच्या दर्शनासाठी जातात. या धार्मिक कार्यक्रमांमध्ये नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतात. तसेच बकरी ईद निमित्य मुस्लिम अनुयायी नमाज अदा करण्यासाठी मस्जिद मध्ये जातात. तसेच मुबारकबाद ला घेऊन घराबाहेर पडत असून मोठ्या हर्षोहल्लासाने बकरी ईद चा उत्सव साजरा करतात . त्याअनुषंगाने धार्मिक मंदिर व मस्जिद परिसरामध्ये साफसफाईची यंत्रणा सज्ज ठेवावी, विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घेऊन वीज पुरवठा सुरळीत ठेवावा, अधिक वेळेपर्यंत मुबलक पाणी पुरवठा करावा, शहरी बस सेवा, आरोग्य सेवा, एसटीची प्रवासी सेवा, आपत्ती व्यवस्थापन सेवा, यासह अन्य नागरी सुविधा तत्परतेने सुरळीत ठेवण्यात याव्यात , तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याची दक्षता घेऊन सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना आ.सौ .सुलभाताई खोडके यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत. तसेच सर्वानी दोन्ही पर्व आनंदाने व हर्षोल्लासाने साजरे करण्याचे आवाहन करीत आमदार महोदयांनी शहरवासीयांना आषाढी एकादशी व बकरी ईद च्या शुभेच्छा दिल्या आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *