NASHIK | समृद्धी महामार्गाचे काम सुरु असल्याने घरांचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली

इगतपुरी तालुक्यातील धामणी येथे मुंबई नागपुर समृद्धी महामार्गाचे काम सुरु आहे. रस्ता बनवण्यासाठी संबधित कंपनी कडुन येथे मोठ्या प्रमाणात सुरुंग लावून ब्लास्टींग केले जात आहे. या ब्लास्टींगमुळे येथील अनेक घरांना मोठे तडे गेले आहेत तर अनेक घरांची पडझड झाली आहे. शुक्रवार दि. २९ रोजी सकाळी ब्लास्टींग सुरु असतांना शिवाजी रघुनाथ भोसले यांची नऊ वर्षीय नात स्वरा बाहेर खेळत असतांना तिच्या बाजुलाच १० ते १२ किलोचा भला मोठा दगड येऊन पडला. सुदैवाने स्वरा ही थोडक्यात बचावली. गेल्या तीन वर्षांपासुन ब्लास्टींगचे काम सुरु असल्यापासुन धामणीतील ग्रामस्थ जीव मुठीत घेऊन जगत आहेत. शुक्रवारी ही ब्लास्टींग सुरु असताना शिवाजी भोसले, केशव भोसले, कचरू भोसले, संदीप भोसले, राधाकृष्ण भोसले, रमेश भोसले, गजीराम भोसले यांच्या घरांवर मोठ्या प्रमाणात दगडी पडल्या तर संदीप नामदेव भोसले यांच्या पोल्ट्रीफार्म दगड पडल्याने अनेक कोंबड्या दगावल्या. तसेच तीन वर्षांपासुन ब्लास्टींगमुळे धामणीतील अनेक बंगल्यांच्या भिंतींना तडे गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. समृद्धीचे काम करणाऱ्या कंपनी कडुन नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी येथील ग्रामस्थांनी अनेक वेळा या कंपनीसह शासन दरबारी निवेदने दिली आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे उत्तमराव भोसले व धनंजय भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली धामणीच्या ग्रामस्थांनी तीन दिवस आमरण उपोषण सुरु केले होते. मात्र येथील ग्रामस्थांना कंपनी कडून आश्वासना पलीकडे अद्याप पर्यंत काहीच मिळाले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *