Amravati | राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये सहभागी होणार एशियन गेम्स पदक विजेते खेळाडू

२१ ते २३ ऑक्टोबर दरम्यान विभागीय क्रीडा संकुल येथे भव्य आयोजन

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद ,अमरावती तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,अमरावती तसेच महाराष्ट्र धनुर्विद्या संघटना यांच्या तांत्रिक सहकार्याने राज्यस्तर शालेय धनुर्विद्या १७ व १९ वर्षा आतील मुले व मुलींच्या क्रीडा स्पर्धेचे आयोजन दिनांक २१ ते २३ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत विभागीय क्रीडा संकुल, अमरावती या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यातील मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, लातूर, नागपूर व अमरावती, क्रीडा प्रबोधिनी एकूण ९ विभागाचे १७/१९ वयोगटातील मुला-मुलींचे संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहे.यासोबतच त्यामध्ये प्रामुख्याने ४०० खेळाडू , मार्गदर्शक, पंच अधिकारी सहभागी होणार आहे. सदर स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू सुद्धा सहभागी होणार आहे.या राज्यस्तरीय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धेचे यशस्वीपणे आयोजन-नियोजन होण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेच्या अधिपत्याखालील तांत्रिक अधिकारी/पंच/तज्ञ प्रशिक्षकांचे सहकार्य घेण्यात येणार असून सदर राज्यस्तरीय धनुर्विद्या या खेळाच्या स्पर्धेचे विभागीय क्रीडा संकुल परिसर स्थित मैदानावर भव्य आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या मुलांची निवास व्यवस्था ही क्रीडा प्रबोधिनी वस्तीगृहामध्ये करण्यात आली आहे.तर मुलींची निवास व्यवस्था ही युवा वस्तीगृहामध्ये करण्यात आली आहे. या राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ शनिवार दिनांक २१ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता विभागीय क्रीडा संकुल येथे होणार आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी व वरिष्ठ सनदी अधिकारी तसेच अमरावती क्रीडा विभागाचे उपसंचालक -विजय संतान आदी मान्यवरांचे उपस्थितीत पार पडणार आहे. यावेळी प्रामुख्याने चीन येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत धनुर्विद्या खेळात भारताचे प्रतिनिधित्व करून प्राविण्यप्राप्त अमरावती येथील आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या खेळाडू – तुषार शेळके, नागपूर येथील ओजेस देवतळे, बुलढाणा येथील प्रथमेश जावकार, सातारा येथील कुमारी अदिती स्वामी हे खेळाडू या राज्यस्तर स्पर्धेचे मुख्य आकर्षण राहणार आहे. याप्रसंगी या नामवंत खेळाडूंचा प्रमुख अतिथी मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. सदर स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेकरिता महाराष्ट्राचा संघ व खेळाडू निवडण्यात येणार असून या स्पर्धेतील सहभागी ,प्राविण्यप्राप्त खेळाडूंना प्रमाणपत्र तसेच सुवर्ण,रौप्य,कांस्य पदक देण्यात येणार आहे. सदर स्पर्धेकरिता जिल्हा प्रशासन,,अमरावती महानगरपालिका,, आरोग्य विभाग, विद्युत विभाग, पोलीस विभाग, विभागीय क्रीडा संकुल इत्यादी विभागाचे सहकार्य लाभत आहे. अमरावती शहरातील खेळाडू, विद्यार्थी, युवक -युवती, क्रीडा प्रेमी, नागरिकांनी खेळाडूंचा उत्साह द्विगुणित करण्याकरिता जास्तीतजास्त संख्येने उपस्थित राहून त्यांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी-गणेश जाधव यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *