मदरशांना पायाभूत सुविधांसाठी १० लाख इतक्या मर्यादेपर्यत अनुदान देण्यास मान्यता

आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी मानले उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचे आभार

अमरावती २९ डिसेंबर : – राज्यातील डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेतील पात्र मदरशांना देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री ना. अजितदादा पवार यांनी राज्याच्या हिवाळी अधिवेशनात नुकतीच केली असता राज्य सरकारच्या अल्पसंख्यांक विभागातर्फे यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. यामध्ये डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र मदरशांना पायाभूत सुविधांसाठी आता २ लाख इतक्या अनुदानाऐवजी १० लाख इतक्या मर्यादेपर्यत अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली आहे. मदरशात शिक्षणाऱ्या गरीब व आर्थिक दुर्बल घटकातील अल्पसंख्यांक मुलांसाठी शैक्षणिक विकासासाठी महत्वपूर्ण धोरण ठरविल्याबद्दल अमरावतीच्या आ.सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री ना.अजितदादा पवार यांचे आभार मानीत अभिनंदन केले आहे.

राज्यातील अल्पसंख्यकांचा शैक्षणिक विकास करण्यासाठी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अल्पसंख्यांक विकास विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. त्यानुसार मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे, ग्रंथालयांसाठी अनुदान, शिक्षकांचे मानधन यांसाठी राज्य सरकारने डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना वर्ष २०१३ सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र मदरशांना २ लाख इतक्या मर्यादेपर्यंत अनुदान मिळत होते. मात्र मर्यादित अनुदानातून विद्यार्थी हिताचे शैक्षणिक उपक्रम व कार्यक्रम राबवितांना मदरशांना अडचणी निर्माण होत असल्याने अनुदानात वाढ करण्याची मागणी करण्यात आली होती. दरम्यान अल्पसंख्याक बांधवांच्या हित व समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर ३१ ऑगस्ट २०२३ रोजी बैठक झाली होती. या बैठकीला जमात-ए-उलेमा हिंद संघटना, वक्फ बोर्डाचे प्रतिनिधी यांच्यासह ३६ जिल्ह्यातील १०३ मौलाना यांची उपस्थिती होती. सामाजिक शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या व अल्पसंख्यांक घटकाला मूळ प्रवाहात आणण्यासाठी अनुकूल धोरण व कार्यक्रम ठरवणे गरजेचे असल्याने या संदर्भात मदरशांना अनुदान वाढविण्यात नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागणी मंजूर करणार असल्याचे आश्वासन मंत्रीमहोदयांच्या वतीने देण्यात आले. तसेच नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशात याबाबत उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी घोषणा केली असल्याने आता राज्य सरकारच्या अल्पसंख्यक विभागातर्फे यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. राज्यातील डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेतील पात्र मदरशांना देण्यात येणाऱ्या अनुदानात २ लाखांवरुन १० लाखांपर्यंत वाढ करण्यात आल्याने शैक्षणिक विकास व पायाभूत सुविधांसाठी चांगली मदत होणार आहे.

राज्यातील मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी महत्त्वाचा निर्णय घेतल्या बद्दल अमरावतीच्या आ.सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री ना.अजितदादा पवार यांचे आभार मानीत अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *