सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांच्याकडून दयासागर रुग्णालयाला व्हेंटिलेटर मशीन मिळाली

आरोग्य सेवेतूनच होते समाजऋण फेडण्याचे मोठे कार्य – आ.सौ. सुलभाताई खोडके

अमरावती ०७ मार्च :- अमरावतीमधील गरीब आणि मध्यमवर्गीय रूग्णांना सेवा देणारी १०० खाटांची वैद्यकीय सुविधा असलेल्या दयासागर हॉस्पिटलमध्ये दाऊदी बोहरा समाजाचे धर्मगुरू परमपावन सैय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांनी सादर केलेल्या नवीन व्हेंटिलेटर मशीनचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी अमरावतीच्या आमदार सौ. सुलभाताई संजय खोडके यांची उपस्थिती होती. आरोग्य सेवेच्या दृष्टीने चांगल्या वैद्यकीय सेवा व संसाधनाची किती आवश्यकता आहे. याची जाणीव सर्वांनाच कोरोना काळात झाली. म्हणूनच अमरावती शहरात सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा व दीर्घकालीन उपाययोजनांवर आपला विशेष भर आहे. गरीब ,गरजू घटकांना उपचार उपलब्ध व्हावा यासाठी दयासागर रुग्णालयाचे रुग्णसेवेचे कार्य संजीवनी देणारे ठरत असून आज व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आले. आरोग्य सेवेतूनच समाजऋण फेडण्याचे मोठे कार्य होत असल्याचे मनोगत आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

व्हेंटिलेटर मशीन गंभीर आजारी रुग्णांना, विशेषतः श्वसनाच्या आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना जीवनरक्षक आधार प्रदान करण्याच्या रुग्णालयाच्या क्षमतेत लक्षणीय वाढ करेल. दयासागर हॉस्पिटलच्या वरिष्ठ वैद्यकीय अधीक्षक डॉ. रचिता म्हणाल्या, “आम्ही परमपावन सैय्यदना मुफद्दल सैफुद्दीन साहिब यांच्या या उदार देणगीबद्दल आणि आमच्या हॉस्पिटलला दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे अत्यंत आभारी आहोत. आमच्या आई.सी.यू मध्ये सर्वोच्च अद्ययावत मॅक्वेट सर्वो व्हेंटिलेशन सिस्टीमची आता भर पडली आहे.”

अमरावतीतील दाऊदी बोहरा समाजाचे संयोजक ऍडव्होकेट शब्बीर हुसेन म्हणाले, “सय्यदना साहिब यांच्या नुकत्याच अमरावती दौऱ्यात त्यांना स्थानिक रुग्णांना, विशेषतः आर्थिकदृष्ट्या वंचित पार्श्वभूमीतील रुग्णांना मदत करण्यासाठी दयासागर हॉस्पिटलला व्हेंटिलेटर मशीन दान करण्यास सांगितले होते.”

“सय्यदना साहिब यांनी दान केलेल्या नवीन मशिनचे उद्घाटन करण्यासाठी आज आम्ही एकत्र आलो याचा आम्हाला आनंद आहे, हे रुग्णालय सर्वांसाठी आरोग्य सेवा प्रदान करण्यात महत्त्वपूर्ण योगदान देत आहे.”

आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी सैय्यदना साहिब यांच्या अलीकडील योगदानांमध्ये राजकोटमध्ये कान, नाक आणि घसा तपासणी मशीन दान, आणि गोंडल, गुजरातमध्ये हेमोडायलिसिस मशीनची स्थापना आणि राजस्थानमध्ये भिंदरला, स्थानिक रुग्णालयात सी-आर्म मशीनची तरतूद यांचा समावेश आहे. या देणग्या दाऊदी बोहरा समुदायाच्या जागतिक परोपकारी, प्रोजेक्ट राईझ प्रयत्नांचा एक भाग आहेत, जे समाजातील असुरक्षित घटकांचे जीवन उंचावण्यासाठी प्रयत्न करतात. असेही यावेळी उल्लेखित करत विश्व कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली.याप्रसंगी दाऊदी बोहरा समाजाचे बांधव व भगिनी मोठ्या संख्येने होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *