पांढरी खानापूर येथील कमानीचा वाद चिघळला; जमावाची पोलिसांवर दगडफेक, पोलिसांचा लाठीचार्ज

दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल – जिल्हाधिकारी

अमरावती : अमरावतीच्या पांढरी खानापूर गावाच्या प्रवेशद्वाराला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात यावं, यासाठी चार दिवसांपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन सुरू होतं. गावातील संचारबंदी झुगारून आंदोलक अमरावतीत दाखल झाले होते. विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातल्या या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. अमरावतीच्या खानापूर पांढरी मधील आंदोलक आणि पोलिसांमध्ये तुफान राडा झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रवेश द्वाराच्या मुद्द्यावरून जमाव आक्रमक झाला आणि त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. तर पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला आहे. संतप्त जमावाने पोलिसांच्या व्हॅनवरही दगडफेक केली. या हल्ल्यामध्ये काही पोलीसही जखमी झाल्याची माहिती आहे. कायदा हातात घेतल्यास कारवाई होईल, असे पोलिस आयुक्त म्हणाले.

तर कालच या बाबत तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन काही सूचना केल्या आहेत. जिल्ह्यातील पांढरी खानापूर गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचा प्रश्न दोन्ही बाजूंकडील लोकांना सोबत घेऊन सामंजस्याने सोडवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न होता. मात्र काल विभागीय आयुक्त कार्यालयावर ज्या पद्धतीने दगडफेक व पोलिसांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली हे करणाऱ्यांवर जिल्हा प्रशासन गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करणार आहे. पांढरी खानापूर ग्रामपंचायत मधील नागरिकांनी कोणत्याही प्रकारे कायदा हातात घेऊ नये शांतता प्रस्थापित करावी. कुणीही कायदा हातात घेतल्यास व असंतोष पसरविल्यास त्याच्यावर पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाई केली जाईल. जी परिस्थिती निर्माण झाली यासाठी दोन्ही पक्षाकडील कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले जाईल व त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *