मोठी बातमी! पूजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड यांचा राजीनामा

पूजा चव्हाण प्रकरणामुळे कोडींत सापडलेल्या वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत राठोड यांनी राजीनामा दिल्याचं वृत्त आहे. विधिमंडळाचं अधिवेशन तोंडावर असतानाच भाजपानं संजय राठोड यांच्या यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत अधिवेशनात कामकाज चालू न देण्याचा इशारा दिला होता. तर उद्धव ठाकरे यांनीही राठोड यांना दोन दिवसांपूर्वीच निर्णय घेण्याचे आदेश दिले होते.

बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर वनमंत्री संजय राठोड अडचणीत आले होते. पूजा चव्हाणसोबतचे फोटो आणि या प्रकरणाशी संबंधित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर भाजपाकडून थेट संजय राठोड यांच्यावर आरोप केला होता. तर राठोड यांनी पोहरादेवी येथे माध्यमांशी बोलताना चौकशीतून सगळं समोर येईल. आपली बदनामी केली जात असल्याचाही आरोपही त्यांनी केला होता. मात्र, अर्थसंकल्पीय अधिवेशन तोंडावर असताना भाजपा नेत्यांनी राठोडांचा राजीनामा घेऊ कारवाई करण्याची मागणी केली होती.

सरकारनं राठोडांवर कारवाई केली नाही, तर अधिवेशनाचं कामकाज चालू देणार नाही, असा इशारा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतपाटील यांनी दिला होता. त्यामुळे सरकारवर दबाव वाढला होता. त्यानंतर आज (२८ फेब्रुवारी) संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. दुपारी अडीच वाजताच्या सुमारास संजय राठोड हे पत्नी शीतल आणि मेहुणे सचिन नाईक यांच्यासह वर्षा बंगल्यावर गेले.

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाच्या चौकशीनंतरच राजीनामा स्वीकारण्याची विनंती राठोड यांनी केली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री एकनाथ शिंदे यांची स्वतंत्र दालनात चर्चा झाली. वर्षा निवासस्थानी झालेल्या चर्चेनंतर संजय राठोड यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला. दरम्यान, संजय राठोड यांच्या राजीनाम्याचं वृत्त समोर आल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. “संजय राठोडांनी राजीनामा दिला असला, तरी पूजाला न्याय मिळायला हवा आणि त्यामुळे राठोड यांना अटक करा,” असं पाटील यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *