ब्रीच कँडीच्या बेडवरून कोरोनाचा आढावा, अन्नधान्यांच्या साठ्याची घेतली माहिती, शस्त्रक्रिया होऊनही पवार इन अ‍ॅक्शन मोड

मुंबई : “शस्त्रक्रिया होऊन सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आपले काम चालू ठेवले आहे. आज भेटायला गेल्यानंतर त्यांनी राज्यात कोरोनाचे संकट वाढत असल्याने त्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अन्नधान्य व नागरी पुरवठ्या विषयी माहिती घेतली”, असं अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं. शरद पवार यांच्यावर काल रात्री यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज त्यांची ब्रीच कॅंडी रूग्णालयात जाऊन भेट घेतली. भुजबळ यांनी त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. या भेटीनंबर भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

भुजबळ नेमकं काय म्हणाले?
“शरद पवार यांच्यावर रात्री शस्त्रक्रिया पार पडली पण तरीदेखील त्यांनी आपल्या कामात खंड पडू दिला नाही. त्यांच्यासोबत राज्यातील कोरोना परिस्थीती विषयी देखील चर्चा झाली”, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली. या भेटीदरम्यान नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ देखील त्यांच्यासोबत होते.

राज्याच्या अन्नधान्य साठ्याबाबत चर्चा

राज्यात कोरोनाची परिस्थीती बिकट होत असल्याने नागरिकांसाठी अतिरिक्त अन्नधान्य द्यावे लागले तर राज्यात सध्या असलेल्या अन्नधान्यांच्या साठ्याबाबत शरद पवार यांनी चर्चा केली, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं. त्याचबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून पुन्हा एकदा राज्याला कोणकोणत्या अतिरिक्त अन्नधान्यांची गरज आहे, केंद्र शासनाकडून अन्नधान्याबाबत करावयाची मागणी याबाबत देखील पवार आणि भुजबळ यांच्यात सविस्तर चर्चा झाली.

‘पवारांची इच्छाशक्ती काम करण्याचे बळ देते’

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण होणाऱ्या इतर प्रश्नासंदर्भात देखील चर्चा केली असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली. “शरद पवारांची प्रचंड इच्छाशक्तीच ही आम्हाला अधिक उत्स्फूर्तपणे काम करण्याचे बळ देते. ते यातून लवकर बरे होऊन पुन्हा त्याच जिद्दीने आपल्या सामाजिक कामाला सुरुवात करतील असा विश्वास आम्हा सर्वांना आहे”, असं देखील ते यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *