मुंबईच्या रस्त्यावर गर्दी पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज, कडक निर्बंध लागू करण्याचा दिला इशारा

मुंबई, 31 मे : राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 15 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केलं. पण, आज मुंबईत मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटनाला जाताना गर्दी पाहून मुख्यमंत्र्यांनी चिंत्रा व्यक्त केली. लोक अजूनही गांभीर्याने घेत नाही, त्यामुळे आणखी कडक निर्बंध लावावे लागेल, असा इशाराच त्यांनी दिली.

‘मुंबईत आज MMRDA म्हणजेच महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वेगवेगळ्या विकास कामांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रोच्या 2 ए आणि 7 या मार्गिकेच्या चाचण्यांचा शुभारंभ केला. या कार्यक्रम सोहळ्याला जात असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रस्त्याने वाहतूक आणि लोकांची गर्दी निदर्शनास आली.

‘मी कालच जनतेशी संवाद साधला होता. काही ठिकाणी निर्बंध सुद्धा कमी केले आहे. आज रस्त्यावर पाहिलं तर सर्वत्र गर्दी दिसून येत आहे. मुंबईकर कोणतेही नियम पाळताना दिसत नाही. त्यामुळे मुंबईत आणखी कडक निर्बंध लागू करावे लागतील’, असा इशाराच मुख्यमंत्र्यांनी दिला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते टी 1 आणि टी 2 ला जोडण्यासाठी अंडरपास व एलिव्हेटेड रस्ते करण्यासाठी भूमीपूजनही पार पडलं. तसंच ठाणे जिल्ह्यातील भिवंडी कल्याण रोड वरील रजनोली उड्डाणपुलाचं आणि दूर्गडी उड्डाणपुलाच्या एका मार्गिकेचे ऑनलाइन उद्घाटनही झालं. मुंबईत प्रवासासाठी मुंबईकरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय यासाठी मेट्रो रेल्वे ही मुंबईकरांची नवी लाईफ लाईन टप्या टप्याने सुरू होत आहे. यासाठी मेट्रोच्या 2 ए आणि 7 या दोन मेट्रो लाईनवर चाचणी घेण्याचा प्रारंभ उद्घाटनानंतर सुरू करण्यात आला आहे.

शिवाय छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाण्यासाठी टी वन आणि टू ला जोडणारा रस्ता लवकरच तयार होत आहे. त्याचा फायदाही विमानतळाच्या दिशेने जाणाऱ्या आणि येणाऱ्या दोन्ही प्रवाशांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. तसेच ठाणे जिल्ह्यातील नव्या रोड कंनेक्टिविटी रजनोली आणि दुर्गडी उड्डाणपुलामुळे प्रवाशांची वाहतूक कोंडी पासून सुटका होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *