शेतकर्‍यांच्या आशा मावळल्या शेंगा भरण्याआधीच सोयाबीन पडले पिवळे

शिरखेड, 
सोयाबीनला शेंगा येईपर्यंत झालेल्या समाधानकारक पावसाने या वर्षी तरी भरघोस पीक हातात येईल म्हणून शिरखेड परिसरातील शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या; परंतु खोडकीड, पिवळा मोझॅक यामुळे साठवलेल्या स्वप्नांवर पाणी फेरल्या गेले आहे. मोर्शी तालुक्यातील शिरखेड परिसरातील शेतकर्‍यांच्या शेतातील पीक शेंगा भरण्याआधीच पिवळे पडायला लागले आहे. 
 

बहरात आलेल्या सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक, खोडकीड आल्यामुळे शेतकर्‍यांचे कमी दिवसाचे नगदी पीक असणारे सोयाबीन ऐन बहरात असतांना अचानक पिवळे पडून वाळण्यास सुरुवात झाली आहे. आता या सोयाबीन पिकापासून उत्पन्न होण्याची अपेक्षा नसल्यामुळे निराश झालेल्या शेतकर्‍यांना उसनवारी व बँकेचे कर्ज असे फेडायचे, असा प्रश्न पडला आहे. शेतकर्‍यांनी त्यावर उपाययोजना म्हणून महागडी औषधे खरेदी करून फवारणी केली; मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही.
 
नेहमीच आर्थिक संकटाचा सामना करणारा पोशिंदा हवालदिल झाला आहे. अनेक आशा, अपेक्षांची पूर्तता होण्याचा मार्गावर असतांना त्यावर पाणी फेरले गेले. निसर्गाच्या चक्रात दुष्ट चक्रात कचकटून सापडणारा व नेहमीच संकटाशी सामना करणारा शेतकरी खरोखरच हतबल झालेला दिसत आहे. सरकारने बळीराजाच्या या गंभीर समस्येची दखल घेऊन नुकसानग्रस्त पिकाचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *