गणेशोत्सवासाठी मातीच्या मूर्तींचाच वापर करा महापालिकेच्या बैठकीत आयुक्त रोडे यांचे आवाहन

अमरावती, 
शहरातील गणेशोत्सवाच्या नियोजनाबाबत महापालिकेत सोमवारी झालेल्या बैठकीत आयुक्त प्रशांत रोडे यांनी मातीपासून निर्मित केलेल्या मूर्तींचा वापर करण्याचे आवाहन शहरवासीयांना केले आहे. 
 
येत्या 10 ते 19 सप्टेंबर या दरम्यान गणपती उत्सवाचा कालावधी आहे. त्याअनुषंगाने महापालिकेचे आयुक्त प्रशांत रोडे यांच्या कक्षामध्ये सोमवार, 30 ऑगस्ट रोजी सभा आयोजित करण्यात आली होती. सभेस आयुक्त प्रशांत रोडे, उपआयुक्त सुरेश पाटील, पर्यावरण संवर्धन अधिकारी महेश देशमुख, शहर अभियंता रविंद्र पवार, सहाय्यक आयुक्त नरेंद्र वानखडे, योगेश पिठे, तौसिफ काझी, वैद्यकीय अधिकारी डॉ. सीमा नेताम, उपअभियंता श्यामकांत टोपरे, प्रमोद इंगोले, भास्कर तिरपुडे, श्रीरंग तायडे उपस्थित होते.
 
गणेशोत्सवनिमित्त सर्व विभाग प्रमुख व खाते प्रमुख यांना विविध जबाबदारी सोपविण्यात आली. गणेशोत्सवानिमित्त गणेश मार्गातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याबाबत कार्यवाही शहर अभियंता विभागातून करण्यात येत आहे. कृत्रिम घरगुती गणपती विसर्जनाकरिता मनपा क्षेत्रामध्ये स्थळ निश्चित करण्यात येत आहे. गणेशोत्सावानिमित्त मुख्य रस्त्यांवरील झाडांच्या फांद्या कापण्याचे काम उद्यान विभागाकडून करण्यात येत आहे. दरवर्षीप्रमाणे प्रथमेश तलाव व छत्री तलाव येथे गणेश मंडळाच्या मोठ्या गणपती विसर्जनाकरिता खड्ड्यांची निर्मिती करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे घरगुती विसर्जनाकरिता खड्डा करुन कृत्रिम तलावाची निर्मिती सुध्दा करण्यात येत आहे. प्रथमेश तलाव येथे सुध्दा दरवर्षीप्रमाणे विसर्जनाबाबतची कार्यवाही करण्यात येत आहे.
 
पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करण्याकरिता शाडूच्या मातीपासून निर्मिती केलेल्या पर्यावरण पुरक मूर्तीचा वापर करावा, गणेश मूर्ती विक्रेत्याकडे गणेश भक्तांनी मातीपासून निर्माण झालेल्या मूर्तीची मागणी करावी, असे आवाहन प्रशांत रोडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *