दिवसाला 50 हजार लसीकरणाचे उद्दिष्ट लसीकरणाची गती वाढवा; ‘मिशनमोड’वर कामे करा जिल्हाधिकारी पवनीत कौर यांचे निर्देश

अमरावती : पुढचे 20 दिवस लसीकरण हे सर्वोच्च प्राधान्य मानून मोहिम स्तरावर काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे दिले.

जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी बैठक बचतभवनात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, सहायक जिल्हाधिकारी मंदार पत्की, धारणी प्रकल्प अधिकारी वैभव वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल आदी यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्रीमती कौर म्हणाल्या की, काही देशांत कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. सिंगापूर येथे लॉकडाऊन आहे. त्यामुळे संभाव्य तिसरी लाट टाळण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्यक आहे. जिल्ह्यात दिवसाला 50 हजार व्यक्तींचे लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे. काही अडचणी असतील तर जिल्हा प्रशासनाला तत्काळ कळवा. उपविभागीय अधिका-यांनी स्वत: या कामांचे संनियंत्रण करावे. या मोहिमेत गावोगाव प्रभावी जनजागृती करावी. लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, सर्व विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था या सर्वांना सहभागी करून घ्यावे. सर्व विभागांनी आपल्या कर्मचा-यांकडूनही दोन मात्रेचे लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र घ्यावे. हे कंत्राटी कर्मचा-यांनाही लागू आहे. रोजगार हमी कामावरही शिबिरे घ्यावीत, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.

ज्यांचे अद्यापही दुसऱ्या मात्रेचे लसीकरण झाले नाही, त्यांचे लसीकरण पूर्ण करून घेणे आवश्यक आहे. आवश्यकतेनुसार मोबाईल लसीकरण वाहन सुरू करा. अचलपूर, नांदगाव खंडेश्वर येथे लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. चिखलदरा, धारणीतही प्रमाण कमी आहे. त्यामुळे गावनिहाय प्रभावी जनजागृती करावी लागेल.

लसीकरणाच्या कामांचा प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय आढावा घ्यावा. मोहिमेतील कामांबाबत 15 नोव्हेंबरला पुन्हा आढावा घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. 100 टक्के लसीकरण केलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रतिनिधींचा सत्कार यावेळी करण्यात आला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, डॉ. विनोद करंजीकर यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *