गडचिरोली । शेतकर्‍यांच्या समस्येला सर्वोच्च प्राधान्य : खा. शरदचंद्र पवार

देसाईगंज येथे राकाँचा कार्यकर्ता मेळावा

देसाईगंज | शेतकरी हा देशाचा पोशिंदा असून शेतकर्‍यांच्या समस्येला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे काम आम्ही करू, अशी ग्वाही माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी दिली.

स्थानिक क्रीडा संकुलाच्या पटांगणावर आज, 18 नोव्हेंबर रोजी शेतकरी, शेतमजूर, कामगार, कार्यकर्ता मेळावा व पक्ष प्रवेश कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रफुल पटेल, आमदार धर्मरावबाबा आत्राम, माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहीते पाटील, माजी खासदार मधूकर कुकडे, माजी जिप अध्यक्षा भाग्यश्री आत्राम, आमदार मनोहर चंद्रकीपुरे, माजी आमदार हरिराम वरखडे, माजी न्यायाधीश ज्ञानदेव परशुरामकर, माजी आमदार राजेंद्र जैन, भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, राकाँचे प्रदेश सरचिटणीस प्रवीण कुंटे, जिल्हा निरीक्षक श्रीकांत शिवणकर, प्रदेश संघटक सचिव युनूस शेख, राकाँचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश ताकसांडे, प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर, जिल्हा युवक निरीक्षक जगदीश पंचबुद्धे, जिल्हा महिला निरीक्षक वंदना आवळे, जिल्हा महिला अध्यक्ष शाहीनभाभी हकीम, रायुकाँचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना पवार म्हणाले की, विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया हे धान उत्पादक जिल्हे म्हणून सर्वपरिचीत आहेत. सतत दोन वर्षे कोरोनामुळे राज्यातील स्थिती अत्यंत नाजूक असली तरी यंदाही धान उत्पादक शेतकर्‍यांना महाविकास आघाडी सरकारकडून बोनस मिळवून देण्याकरिता प्रयत्न करू तसेच जे शेतकरी नियमित कर्ज फेडतात, अशा शेतकर्‍यांना दिलेल्या आश्‍वासनाप्रमाणे 50 हजार रूपये प्रोत्साहन देण्यासाठी संबंधित मंत्र्यांशी चर्चा करून शेतकर्‍यांचे प्रश्‍न मार्गी लावल्या जाईल. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प व इतर अनेक असलेल्या समस्यांकडेही महाविकास आघाडी सरकार शर्तीचे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार पवार यांचे स्वागत करण्यात आले. तसेच त्यांना लाकडावर कोरलेल्या संविधान उद्देशीका व हिरेजळीत काटे असलेली लाकडी घड्याळ व पवार यांची पेंटींग केलेली फोटो प्रदान करण्यात आली. यावेळी जिपचे माजी कृषी सभापती तथा विद्यमान सदस्य नाना नाकाडे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह पवार यांच्या उपस्थित राकाँत प्रवेश केला. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *