विनायक विद्यामंदिर महाविद्यालयात वुमेन सेलचे उद्घाटन

प्रवीण खोडके मेमोरियल ट्रस्टद्वारा संचालित विनायक विद्यामंदिर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अमरावती येथे “वुमेन सेल 2021-22” चे दिनांक 24-12-2021 रोजी उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी विमलाबाई देशमुख महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. मंदा नांदुरकर, विनायक विद्यामंदिरचे प्राचार्य डॉ. पद्माकर टाले, वुमेन सेलच्या समन्वयिका प्राध्यापक संगीता बंड आदी मान्यवर उपस्थित होते.

या वुमेन सेलचे उद्घाटन प्रा.डॉ.मंदा नांदुरकर यांच्या हस्ते करण्यात आले.वुमेन सेल समितीच्या स्थापनेमागील प्रमुख उद्देश फक्त स्त्रियांना शिक्षित करणे हाच नसून त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणे तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सजग करणे हा होता. उद्घाटन सोहळ्याची सुरुवात सर्वप्रथम दीपप्रज्वलन व सावित्रीबाई फुले आणि कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. स्वागतानंतर वुमेन सेलच्या समन्वयिका प्रा. संगीता बंड यांनी प्रास्ताविकपर बोलताना वुमेन सेल स्थापनेची आवश्यकता स्पष्ट केली. त्या म्हणाल्या स्त्रियांना तसेच महाविद्यालयीन तरुणींना केवळ शिक्षण घेऊन सुशिक्षित होणे एवढा दृष्टिकोन ठेवून चालणार नाही. त्यांनी व्यक्तिमत्व, आरोग्य, स्वसंरक्षण या गोष्टींना पण महत्त्व देणे गरजेचे आहे. पुढे बोलताना त्यांनी आजपर्यंत वुमेन सेल अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा देखील आढावा घेतला.

वुमेन सेलचे उद्घाटक प्रा. डॉ.मंदा नांदुरकर यांनी महाविद्यालयीन विद्यार्थिनींना व स्त्रियांना “HTAL” चा मूलमंत्र दिला.त्या म्हणाल्या स्त्रियांच्या सर्वांगीण विकासासाठी हा मूलमंत्र अतिशय आवश्यक आहे. H म्हणजे Health(आरोग्या)कडे स्त्रियांनी लक्ष देणे अतिशय गरजेचे आहे. स्त्री नेहमीच स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते.स्त्री सुदृढ राहिली तरच देश, समाज व संस्कृती सुदृढ राहील. T म्हणजे Time (वेळ). आजच्या काळात टाईम मॅनेजमेंट ला महत्त्व देऊन स्त्रियांनी आपली प्रगती केली पाहिजे. A म्हणजे Attitude बद्दल बोलतानाअहंकार, गर्व नसावा असे त्यांनी सांगितले. मीपणाचा अहंकार मानवाच्या प्रगतीसाठी नेहमीच घातक ठरत असतो. L चे Love (प्रेमाचे) महत्व सांगताना त्यांनी भगतसिंग,राजगुरू, सुखदेव यांचे उदाहरण दिले. प्रेम कसे असावे तर भगतसिंगांनी जसे भारत मातेवर केले तसे असावे. प्रत्येकाने सर्वप्रथम आपल्या देशावर, मातृभूमीवर प्रेम करावे हाच प्रेमाचा खरा अर्थ आहे. हा HTAL चा मूलमंत्र प्रत्येकाने आपल्या जीवनात अंगीकारणे अतिशय आवश्यक आहे असे प्रा.डॉ. मंदा नांदुरकर म्हणाल्या. पुढे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ.पद्माकर टाले यांनी महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी प्रत्येक क्षेत्रात प्रगती करावी आणि स्वतःचे व्यक्तिमत्व घडवावे असे सांगितले. कला, विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवसाय, सामाजिक, राजकीय अशा सर्वच क्षेत्रात पुरुष आणि स्त्री यांनी एकत्रितपणे वाटचाल करणे गरजेचे आहे. त्याशिवाय देश सामर्थ्यशाली होऊ शकणार नाही असेही ते म्हणाले.

या उद्घाटन सोहळ्याला कला विभाग प्रमुख प्रा.डॉ.सागर पडोळे, विज्ञान विभाग प्रमुख प्रा.अजय सोनारकर, प्रा. डॉ.नरेंद्र वानखडे, प्रा. दीपक सुखदेवे, प्रा. धनराज इंगोले, प्रा.अनिकेत माथने, प्रा. संदीप चंदेल प्रा.चंद्रकांत चौधरी, प्रा. प्रमोद ढोले, प्रा.धीरज नेवारे, प्रा. प्रिया चंदेल, प्रा. वैष्णवी बोबडे, ग्रंथपाल पूनम राऊत आदी प्राध्यापक उपस्थित होते तसेच रोशन माहोरे, सागर देशमुख, निखिल इंगळे, रवी खडसे, पूजा लाडोळे आदी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थी प्रतिनिधी कु. ऐश्वर्या रूपनारायण व कु.प्रियंका चुडे उपस्थित होत्या. महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.दिपाली राऊत यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.शिल्पा दलाल आणि आभार प्रदर्शन प्रा.डॉ.शितल काळे यांनी केले. या कार्यक्रमाला पिकेएमटीचे संचालक श्री.यश खोडके यांनी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *