नागपूर महापालिका निवडणुकीचा धुरळा; भाजपा उमेदवार निवडीसाठी करणार सर्व्हे

नागपूर : 15 वर्षांपासून नागपूर महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपला येणारी महापालिका निवडणूक प्रतिष्ठेची आहे. त्यामुळं त्यांनी चांगलीच कंबर कसली आहे. भाजपमध्ये जुने नगरसेवक असो की मग नवीन. सगळ्यांना कठीण परिस्थितीतून जावं लागणार आहे. कारण भाजप उमेदवारांना तिकीट देण्याआधी प्रत्येक भागात नगरसेवकांनी केलेल्या कामाचा आढावा घेतला जाणार आहे. त्यांची नागरिकांत असणारी पत, लोकप्रियता लक्षात घेतले जाणार आहे. नागरिकांशी असलेले संबंध त्याचप्रमाणे त्या उमेदवारांची क्षमता तपासण्यात येणार आहे. अंतर्गत सर्व्हे सुरू झाले आहेत. काही पक्षांतर्गत सर्व्हे होत आहेत. तर काही सर्व्हे मोठ्या एजंसीमार्फत केले जात आहेत. वरिष्ठ नेत्यांचासुद्धा सर्व्ह होणार आहे. त्यामुळे ज्यांचा फरफार्मन्स चांगला त्यालाच तिकीट मिळण्याची शक्यता आहे. यात अनेकांना धक्का बसण्याची शक्यतासुद्धा वर्तविली जात आहे.

भाजप नेहमीच कुठल्याही निवडणुकीपूर्वी अभ्यास करत असते. यावेळी सुद्धा तीच पद्धत वापरण्यात येत आहे. प्रत्येक गोष्टीवर आणि कामावर लक्ष ठेवून आहे. नागपूर महापालिकेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. त्यामुळं याकडे अनेक वरिष्ठ पदाधिकारी सुद्धा लक्ष ठेऊन आहेत. यातील दोन सर्व्हे आधीच पार पडले आहेत. तर बाकी अंतर्गत पद्धतीने आणि एजंसीच्या माध्यमातून सर्वे सुरू असल्याचे सत्ता पक्ष नेता अविनाश ठाकरे यांनी सांगितलं.

नागपूर महापालिकेची प्रभाग रचना सोमवारी सायंकाळपर्यंत निश्चित होईल. मात्र, यासंदर्भात कुणीही अधिकृत माहिती देण्यास तयार नाही. लोकसंख्या वाढल्यामुळं नगरसेवकांची संख्या 151 ऐवजी 156 होणार आहे. महापालिका निवडणूक मार्चच्या शेवटी किंवा एप्रिलमध्ये होऊ शकते. अशावेळी भाजपतर्फे सर्व्हे केला जात असल्यानं आपला पत्ता कट तर होणार नाही ना, अशी भीती काही नगरसेवकांना वाटत आहे. काही नगरसेवक आता सेटिंग लावता येते का, याचा प्रयत्न करत आहेत. पण, वेगवेगळ्या पद्धतीनं सर्व्हे होत असल्यानं कुणा एका सर्व्हेवर निर्णय घेतला जाणार नाही. त्यामुळं नगरसेवकांची धकधक वाढली आहे. तरीही पक्षाची तिकीट मिळाली नाही, तर दुसऱ्या पक्षातून उभे राहण्याची तयारी काहींनी चालविली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *