आठवीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजना परीक्षेत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा – आ. सुलभाताई खोडके यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने येत्या १० एप्रिलला शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन

पुणे / अमरावती : महाराष्ट्रातील आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थी शोधण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (एन.एम.एम. एस.) या परीक्षेचे महत्व अनन्यसाधारण आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-१ यांचे मार्फत २०२१-२२ इयत्ता आठवी साठी ही परीक्षा येत्या दिनांक १० एप्रिल २०२२ रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन अमरावतीच्या आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी केले आहे.

सन २००७-०८ पासून इयत्ता आठवीतील आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक साहाय्य करणे व त्यानुसार विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी, हा या योजने मागचा उद्देश आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे शाळा टाळेबंद असल्याने अनेक विद्यार्थी या शिष्यवृत्ती योजनेच्या लाभापासून वंचित आहेत . दरम्यान राज्य शासनाने यासंदर्भात नियोजन चालविले असल्याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे च्या वतीने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा येत्या १० एप्रिल २०२२ रोजी घेण्याचे ठरविण्यात आले आहे. सदर परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदन भरण्यासही सुरुवात झाली असून परिषदेच्या संकेतस्थळावर याबाबत शाळांना माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्यामध्ये अर्ज करण्याची पद्धत, पात्रता, विद्यार्थ्यांची निवड पद्धती, परीक्षेचे वेळापत्रक, परीक्षेसाठीचे विषय , आरक्षण व शिष्यवृत्ती संख्या , शुल्क, आदी बाबी नमूद करण्यात आल्या आहे. सदर योजने अंतर्गत शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास इयत्ता नववी ते बारावी पर्यंत दरमहा एक हजार प्रमाणे वार्षिक रुपये बारा हजार इतकी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. सदर परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शालेय क्षमता, बौद्धिक क्षमतांचा विकास करून आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी व त्यांना शिक्षण घेण्यास मदत व्हावी हा या योजनेचा उद्देश आहे, तेव्हा इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेत सहभागी होऊन शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा, त्याचबरोबर शाळांनी देखील याबाबत पुढाकार घ्यावा तसेच पालकांनी सुद्धा विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन अमरावतीच्या आ. सौ.सुलभाताई खोडके यांनी केले आहे.

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा आयोजन संदर्भात आ. सौ . सुलभाताई खोडके यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे चे आयुक्त एच . आय . आतार यांच्याची चर्चा केली . विद्यार्थी हीत व सुरक्षा लक्षात घेता कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून परीक्षेचे नियोजन करावे ,याबाबत वर्तमानपत्रे , आकाशवाणी व दूरदर्शन सारख्या विश्वसनीय माध्यमांमधून प्रसिद्धी देऊन शाळा व विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत अवगत करावे , तसेच सर्व शाळांना परीक्षेसंदर्भातील परिपत्रक पाठवून शाळांनी विद्यार्थ्यांकडून तयारी करून घ्यावी , व आर्थिक दुर्बल घटकांतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या परीक्षेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे अशी सूचना आ. सौ . सुलभाताई खोडके यांच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *