अमरावती । प्राची मेहता यांना घुबड संशोधनासाठी पुरस्कार, मेळघाटात सुरु आहे संशोधन

धारणी । मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वन्य प्राणी तथा दुर्मिळ पक्ष्यांचे माहेरघर असलेल्या चौराकुंड वनपरिक्षेत्रात मागील पाच वर्षांपासून रानपिंगळा (जंगली घुबड) या दुर्मिळ आणि 1884 सालापासून लुप्तप्राय झालेल्या शिकारी पक्षावर संशोधन व अभ्यास यशस्वीपणे करण्यासाठी डॉ. प्राची मेहता, पुणे यांना आंतरराष्ट्रीय आऊल हॉल ऑफ फेमसाठी विशेष कामगिरी म्हणून पुरस्कृत करण्यात आले आहे.

भारतात घुबडांच्या 35 प्रजाती आढळतात. रानपिंगळा हा 1884 नंतर पक्षी मित्रांना दिसला नाही. यामुळे देशातून हा फॉरेस्ट आऊल नामशेष झाल्याचे मानले गेले. दरम्यान अमेरिकेन पक्षी शास्त्रज्ञ डॉ. पामेला रासनुसेन यांनी महाराष्ट्रातील नंदुरबार आणि मध्य प्रदेशातील धारणी भागाला लागून असलेल्या मध्यप्रदेशातील खकनारच्या जंगलात रानपिंगळ्याचा शोध लावला. ही घटना 1997 सालची आहे. यानंतर मेळघाटात पण या दुर्मिळ रानपिंगळ्याचे अस्तित्व सिद्ध झालेले आहे. जवळपास सर्व पिंगळे निशाचर असतात, मात्र रानपिंगळा दिवसा विचरण करतो. आकाराने 7 सें. मी. आहे. सिपना वन्यजीव विभागातील धारणी जवळच्या मध्य प्रदेशाच्या सीमेवरील चौराकुंड भागात डब्ल्युआरसीएस पुणेतर्फे संशोधन प्रकल्प हाती घेण्यात आला. प्राची यांच्या मार्गदर्शनात घुबडांचा पर्यावरणावर होणारा परिणाम, रेडिओ टेलीमेट्रीसारखे तंत्र, आदिवासी समाजात स्थापित गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृती, रानपिंगळ्यांचे कलर बॅडिंग, घरट्यांवर ट्रॅप कॅमेराचा वापर, या सर्व मुद्यांचा अवलंब करून रानपिंगळ्याची विशेष माहिती प्राप्त करण्यात आली. या प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी डॉ. प्राची मेहता यांना आंतरराष्ट्रीय घुबड केन्द्राकडून यंदाचा मानाचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. मेळघाटसह संपूर्ण देशात डॉ. मेहतांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *