शरद पवारांनाच यूपीएचे अध्यक्ष करा, संजय राऊतांनी सांगितला फॉर्म्युला

नवी दिल्ली, 30 मार्च : पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपने दमदार विजय मिळवल्यानंतर तिसऱ्या आघाडीची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. अशातच यूपीएचे अध्यक्ष शरद पवार यांना करावे, अशी मागणी पुन्हा एकदा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत नवी दिल्लीच्या दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी वरूण गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

वरुण गांधी यांच्यासोबत ही एक सदिच्छा भेट होती. आम्ही अनेक विषयावर चर्चा केली, ते चांगले लेखक आहेत, राजकीय विषय चर्चेत निघत असतात. वरूण गांधी आणि त्यांच्या परिवाराचे ठाकरे परिवाराशी घनिष्ठ संबंध आहेत. यापुढे आम्ही भेटणार आहोत, असं राऊत म्हणाले.

शरद पवार यांना युपीएचे अध्यक्ष करावं. या भूमिकेचे आम्ही नेहमीच स्वागत केलं आहे. विरोधी पक्षाची एकजूट जर आपल्याला करायची असेल, बिगर भाजपशासित राज्याचे मुख्यमंत्री यांना एकत्र आणायचं असेल तर हे काम शरद पवार या अगोदर नक्कीच करू शकतात, असंही संजय राऊत म्हणाले. संजय राऊत यांनी याआधीही शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्ष करण्याची मागणी केली होती.

राष्ट्रीय विकासाला खिळ घालण्यासाठी शिवसेनेने कधीच पुढाकार घेतला नाही. कोकणात नाणार प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी माझी भेट घेतली. त्यांनी नाणार प्रकल्प विदर्भात नेता आला तर आम्ही त्याचे स्वागत करू अशी भूमिका मांडली.

समृद्धी महामार्गादरम्यान ज्या ठिकाणी जलप्रकल्प आहेत त्या ठिकाणी हा प्रकल्प झाला तर त्याचा फायदा महाराष्ट्राला आणि विदर्भाला होईल. या संदर्भात आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतली आहे. विदर्भात हा प्रकल्प होऊ शकतो का? हे पाहण्यासाठी एक समिती नेमण्याची आशिष देशमुख यांनी मागणी केली असल्याची माहिती, संजय राऊत यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *