आणखी 4 दिवस राज्यात उष्णतेची तीव्र लाट, ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याचा हाय अलर्ट

नागपूर : गेल्या काही दिवसांत हवेच्या बदललेल्या पॅटर्नमुळे महाराष्ट्रासह देशात कमाल तापमानाचा पारा वाढला आहे. भारतातील अनेक शहरात उन्हाचा चटका वाढला असून नागरिक हवालदिल झाले आहेत. मराठवाडा आणि विदर्भात तर सूर्याने आग ओकायला सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी उष्णतेचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे. काल चंद्रपूर याठिकाणी देशातील सर्वाधिक 43.4 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदलं आहे.

दरम्यान अनेकांना उष्माघाताच्या समस्या देखील जाणवल्या आहेत. अशात जळगावातील एक शेतकरी महाराष्ट्रातील यंदाचा उष्माघाताचा पहिला बळी ठरला आहे. शेतात काम करून घरी परत येत असताना त्यांना उष्माघात झाला आहे. या दुर्दैवी घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. जितेंद्र संजय माळी असं उष्माघाताने मृत पावलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. दुपारपर्यंत त्यांनी रस्त्यावर खमंग विकले होते. त्यानंतर शेतात जाऊन केलं. दरम्यान घरी परतत असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हवामान खात्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दुपारच्या वेळी घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

हवामान खात्याने आज अहमदनगर, बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि नागपूर या सहा जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. याठिकाणी याठिकाणी तीव्र उष्णतेची लाट धडकण्याची शक्यता आहे. आज सकाळपासून येथील तापमान उष्ण राहिलं असून नागरिकांना उकाड्याचा प्रचंड त्रास झाला आहे. उद्या राज्यात उष्णतेची तीव्रता आणखी वाढणार आहे. हवामान खात्याने उद्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.

आजपासून सलग चार दिवस राज्यातील विविध भागात उष्णतेच्या लाटा धडकण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांचं कमाल तापमान 43 ते 44 अंश सेल्सिअस दरम्यान नोंदण्याची शक्यता आहे. 2 एप्रिलपासून राज्यातील नागरिकांना किंचितसा दिलासा मिळाण्याची शक्यता आहे. शनिवारनंतर (2 एप्रिल) राज्यात अनेक ठिकाणी किमान आणि कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *