मेळघाटातील आरोग्य विभागाबाबत भयाण वास्तव; चिमुकल्याच्या मृतदेहासह आईचा एसटीनं प्रवास;

रुग्णवाहिका न मिळाल्यानं मागितली भिक, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई होणार का ?

अमरावती : जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील धरमडोह येथील सरीता किशोर कासदेकर या महिलेचा चिमुकला दगावला. आरोग्य विभागातर्फे रुग्णवाहिका व मदत मिळाली नाही. त्यामुळं अमरावतीपर्यंत मृतदेह एसटीत आणावा लागला. त्याचे पडसाद मोठ्या प्रमाणात उमटले. संबंधित डॉक्टरसह जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांविरुद्ध तात्काळ निलंबन करा. कारवाई न झाल्यास विधानसभेच्या पायरीवर बसून आंदोलन करणार. असा इशारा मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी एका पत्राद्वारे आरोग्यमंत्र्यांना दिला आहे.

मेळघाटातील रुग्णवाहिका बियर बार आणि धाब्यावर थांबत असल्याची बाब उघडकीस आली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वीचा आरोग्यमंत्र्यांचा मेळघाटात दौरा झाला. मात्र आरोग्य यंत्रणा आदिवासींच्या जीवावर उठल्याचे चित्र पुन्हा पाहायला मिळाले. चिखलदरा तालुक्यातील धरमडोह या गावामधील सरीता किशोर कास्देकर या महिलेची प्रसुती टॅम्ब्रुसोडा प्रा. आ. केंद्र येथे झाली. बाळाची प्रकृती बिघडल्यावर उपचाराकरिता बाळाला टॅम्बुसोंडा येथून अचलपूर. अचलपूरवरुन अमरावती व अमरावती येथून नागपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाठविण्यात आले.

अठरा दिवस बालकावर नागपूर येथे उपचार करण्यात आले. उपचारादरम्यान बालकाचा नागपूर येथे रुग्णालयात मृत्यू झाला. नियमानुसार मृतक बालकाचा मृतदेह त्याच्या पालकांसह शासकीय रुग्णवाहिकेने त्यांच्या घरी गावामध्ये पोहचविणे आवश्यक होते. पण डॉ. चंदन पिंपरकर वैद्यकीय अधिकारी प्रा. आ. केंद्र टॅम्ब्रुसोंडा व डॉ. दिलीप रणमळे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांच्याशी मृतकाचे नातेवाईकांनी वारंवार संपर्क केला.

त्यांनी मृतदेह नेण्याकरिता कोणताही प्रतिसाद दिला नाही. संबंधित डॉक्टरसह जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांविरुद्ध तात्काळ निलंबन आणि हकालपट्टीची कारवाई करा. अन्यथा विधानसभेच्या पायरीवर बसून आंदोलन करणार असल्याचा इशारा मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *