अकोला । राज्यात आणखीन एका शेतकऱ्याचा बळी; बॅंकेचे कर्ज डोईजड झाल्याने संपवले जीवन

राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण थांबण्याचे नाव घेत नाही. दररोज एका शेतकऱ्याच्या आत्महत्येची घटना समोर येत आहे. सततच्या नापिकीने आज आणखीन एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. अकोल्यातील दगडपारवा गावातील एका शेतकऱ्याने बॅंकेचे कर्ज डोईजड झाल्याने स्वत:चे जीवन संपवले आहे. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

प्राप्त माहितीनुसार, दत्तात्रेय गोपाल मुळे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्यावर भारतीय स्टेट बँकेचे कर्ज असल्यामुळे ते चिंतेत होते. त्यातच सततची नापिकी असल्यामुळे ते कर्जाची परतफेड करण्यासाठी असमर्थ होते. या विवंचनेतून कशी सुटका करून घ्यावी हे त्यांना सुचत नव्हते. अशातच राहत्या घरी विष प्राशन केले.

कुटुबीयांना याची माहिती मिळताच त्यांना सर्वोपचार रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात घेऊन जात असताना रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. शेतकऱ्याच्या आत्महत्येमुळे त्यांच्या कुटुंबावर प्रचंड आघात झाला आहे. त्यांच्या पश्चात दोन मुली व एक मुलगा असा परिवार असून एका मुलीचे लग्न झालेले आहे. तर दुसरी मुलगी शिक्षण घेत आहे. बार्शिटाकळी पोलिसांनी या विषयीची नोंद घेऊन, मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठवला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथविधीनंतर पहिलीच घोषणा केली, ती म्हणजे ‘शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र’ करण्याची, दरम्यान यावर अकोल्याच्या कृषी विद्यापीठाचे कुलगुरू यांना विचारले असता आतापर्यंत कुठल्याही प्रकारचे आदेश सुचना शासनाकडून प्राप्त झाल्या नसल्याचं सांगितलं होतं. तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *