संत गाडगेबाबांनी सांगितलेल्या मूल्यांचा होणारा -हास पाहून मन व्यथित होते – श्री भाऊरावजी काळे

अमरावती – (दि. 31.05.2023)
संत गाडगेबाबांनी आपल्या संपूर्ण आयुष्यभर सामाजिक विकासासाठी सांगतलेल्या मूल्यांचा होत असलेला -­हास पासून मन व्यथित होते, असे मत संत गाडगेबाबांच्या सानिध्यात राहून त्यांचे चालक म्हणून जबाबदारी पार पाडणा-या 93 वर्षीय मुंबईत स्थित रहिवासी श्री भाऊरावजी काळे यांनी व्य्कत केले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागाअंतर्गत चालवल्या जाणा-या एम. ए.छत्रपती शिवाजी महाराज विचारधारा व व्यवस्थापन अभ्यासक्रमाद्वारे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी माजी प्र-कुलगुरू डॉ.जयकिरण तिडके, डॉ.श्रीकांत पाटील व जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर उपस्थित होते.
संत गाडगेबाबांनी रात्रंदिवस सामाजिक कार्य केले. त्याकाळी प्रचंड अंधश्रद्धा होती. समाजामध्ये व्यसनाधिनता प्रचंड होती. अशा काळामध्ये सामाजिक जनजागृती करणे खूप कठीण कार्य होतं. गाडगे बाबा सतत कार्यमग्न असायचे. त्याकाळी प्रबोधनकार ठाकरे यांचेसह मोठमोठी माणसं त्यांना भेटायची. गोरगरीबांसाठी राहण्याची व्यवस्था म्हणून त्यांनी धर्मशाळा बांधली. पण आज त्यांच्या मूल्यांचा व शिकवणीचा सध्या होणारा -हास पाहून मन व्यथित होते. त्यामुळे समाजाची पुनर्स्थापना करण्यासाठी संत गाडगेबाबांनी सांगितलेल्या ध्येयधोरणाचा पुन्हा विचार होण्याची नितांत गरज आहे. ते पुढे म्हणाले की संत गाडगेबाबांनी शिक्षणाचा विस्तार, आदर्श विद्यार्थी व पर्यायाने आदर्श समाज व्यवस्था कशी उभी राहील, यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. गाडगेबाबांच्या अनेक आठवणीही त्यांनी याप्रसंगी सांगितल्या तेव्हा अनेकांचे डोळे पाणावले. संत गाडगेबाबा यांचे नाव अमरावती विद्यापीठाला दिल्यामुळे गाडगेबाबांच्या विचारांना पुढे नेता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सुरूवातीला छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. शाल, श्रीफळ व भेट वस्तु देवून संचालक डॉ.श्रीकांत पाटील व जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांनी विद्यापीठाच्यावतीने श्री भाऊरावजी काळे यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्याकरिता डॉ. भैय्यासाहेब चिखले, डॉ. वैभव मस्के, प्रा.रामकृष्ण ओलीवकर, प्रा. मनोज वाहाणे, प्रा.वैभव जिचकार, प्रा.सुरेश पवार, प्रा.आदित्य पुंड, प्रा. विनय पदमवार, प्रा.माधुरी पुनसे, डॉ. अश्विनी राऊत राधिका खडके प्रा. महल्ले इत्यादींनी प्रयत्न केले. कार्यक्रमाला शिक्षक विद्यार्थी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *