राज्यात मान्सून आजपासून सक्रिय; पुढील २४ तासांत अनेक जिल्ह्यात पाऊस

नागपूर: राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रीय होत असून आजपासून राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. ऑगस्टमध्ये रुसून बसलेला मान्सून सप्टेंबरमध्ये पुन्हा परतला. सप्टेंबरमध्ये कृष्ण जन्माष्टमीपासून राज्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला. तीन, चार दिवस पाऊस झाल्यानंतर मान्सूनने विश्रांती घेतली होती. आता पुन्हा १४ सप्टेंबरपासून मान्सून सक्रीय होत आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्यामुळे मान्सून सक्रीय झाला आहे.

राज्यात अनेक भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. पुढील २४ तासांत राज्यातील अनेक भागात पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान विभागाने मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा “यलो अलर्ट” दिला आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव जिल्ह्यात “यलो अलर्ट” दिला आहे तर मराठवाड्यातील नांदेड, परभणी, औरंगाबाद, जालना या चार जिल्ह्यांना “यलो अलर्ट” आहे. तसेच विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना “येलो अलर्ट’ दिला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. पुढील काही तासांत याचे रूपांतर अतितीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होण्याची शक्यता आहे. यामुळे अजून काही दिवस राज्यात मॉन्सून सक्रिय होईल आणि राज्यात सर्वत्र पाऊस पडणार आहे. विदर्भ आणि कोकणात १७ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *