लोकशाही सक्षमीकरणासाठी मतदार नोंदणी मोहिमेत सहभागी व्हा – आ. सौ. सुलभाताई खोडके

अमरावती १७ नोव्हेंबर भारतीय संविधानाने प्रत्येक १८ वर्षावरील भारतीय नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. लोकशाही अधिक सुदृढ बनविण्यासाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावणे महत्वाचे आहे. प्रत्येक व्यक्तीचे मत हे खूप मौल्यवान असून मतदार बांधव आपल्या मताचा वापर करून राष्ट्राच्या उभारणीत आणि विकासात पूर्ण सहकार्य करू शकतात. म्हणूनच प्रत्येक प्रौढ नागरिकाने प्रत्येक निवडणुकीत आपल्या मताचा वापर केला पाहिजे . या उद्देशाने भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघामध्ये मतदार नोंदणी मोहीम राबविण्यास सुरुवात झाली आहे. लोकशाही सक्षमीकरणासाठी मतदार नोंदणी मोहिमेत सहभागी व्हा ,असे आवाहन आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी नवमतदारांना केले आहे.

लोकशाही सक्षमीकरणाची पहिली पायरी मतदार नोंदणी असून निवडणूका पारदर्शक आणि न्याय वातारणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्यावतीकरण, शुध्दीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असते. यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून दरवर्षी प्रमाणे यावर्षीसुद्धा मतदार नोंदणी व प्रारूप मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम दिनांक २७ ऑक्टोबर ते ९ डिसेंबर २०२३ या कालावधीत राबविला जाणार आहे.

या अंतर्गत दि. १ जानेवारी २०२४ रोजी किंवा त्या आधी वयाची १८ वर्षे पूर्ण झालेले नागरिक यांना या कालावधीत आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे. नवमतदारांना आगामी सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मताधिकार बजावण्यासाठी ही महत्त्वाची संधी आहे . याकरिता पात्र नवमतदार व ज्यांचे नाव मतदार यादीत नाही, अशा सर्व पात्र मतदारांनी मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करावी. यासाठी व्होटर हेल्पलाईन ॲप किंवा voters.eci.gov.in व ceo.maharashtra.gov.in चा वापर करावा किंवा जवळचे मतदान केंद्रावर बीएलओकडे जाऊन नमुना ६ चा अर्ज भरावा किंवा संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आ.सौ.सुलभाताई खोडके यांनी केले आहे.

भारत हा तरूणाचा देश आहे. त्यामुळे युवा मतदारांची नोंदणी वाढवण्यासाठी महाविद्यालयात शिबीर घेण्यात यावे. तसेच सामाजिक मंडळे व संस्था यांच्या माध्यमातून मतदार नोंदणीसाठी मेळावे व शिबीर आयोजित करण्यात यावे, नवमतदार नोंदणी मोहीम गतीने पुर्ण व्हावी ,यासाठी बीएलओ मार्फत घरोघरी जाऊन नोंदणी संदर्भात प्रभावी कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना सुद्धा आमदार महोदयांच्या वतीने संबंधित प्रशासनाला करण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *