काँग्रेस आमदाराच्या कारचा भीषण अपघात; ट्रॅक्टरला दिली जोरदार धडक, एक ठार

दर्यापूरचे काँग्रेसचे आमदार बळवंत वानखडे यांच्या कारनं एका ट्रॅक्टरला धडक दिली. यात ट्रॅक्टरमध्ये असणाऱ्या एका शेतमजूराचा मृत्यू झालाय, तर चार जण जखमी झाले आहेत. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर अंजनगाव सुर्जी विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे बळवंत वानखडे हे आमदार आहेत. त्यांच्या गाडीला दर्यापूर अमरावती मार्गावर असणाऱ्या लाखापूर फाट्याजवळ शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात एक जण ठार झाला असून, चौघे जखमी झाले आहेत. यावेळी आमदार बळवंत वानखडे हे याच गाडीच्या मागं जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री आणि तिवसाच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या वाहनातून येत होते, आमदार बळवंत वानखडे यांची गाडी समोर सुसाट वेगानं निघाली होती. दरम्यान, लाखापूर फाट्याजवळ आमदार बळवंत वानखडे यांच्या भरधाव वेगात असणाऱ्या वाहनानं कापूस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला मागून धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की आमदार बळवंत वानखडे यांच्या गाडीच्या समोरच्या भागाचा चुराडा झाला. या भीषण अपघातात ट्रॅक्टरमध्ये असणारे मोहम्मद खलिल हे घटनास्थळी ठार झाले. तर कापसाच्या ट्रॅक्टरमध्ये असणारे पाच मजूर गंभीर जखमी झालेत. गंभीर जखमी असणाऱ्या दोन मजुरांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आलं. हे सगळे दर्यापूर येथील रहिवासी आहेत. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देखील घटनास्थळाकडे धाव घेतली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *