जगाला प्रेम, शांती व अहिंसेचा प्रभू येशू यांनी दिलेला संदेश हा युगानुयुगे टिकणारा आहे – आ. सौ. सुलभाताई खोडके

  • मेरी ख्रिसमस कार्यक्रमात आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी केली विश्व कल्याणासाठी प्रार्थना
  • जगाला प्रभू येशूच्या शांती व प्रेमाची खऱ्या अर्थाने गरज आहे – आमदार सौ. सुलभाताई खोडके
  • प्रभू येशूचे विचार व शिकवण रुजविण्याची आवश्यकता – आमदार सौ. सुलभाताई खोडके
  • सेंट फ्रान्सिस झेव्हीअर चर्च येथे नाताळ सणाचा आनंदोत्सव साजरा
  • प्रभू येशूच्या जन्माची गाणी ( कॅरॉल ) चे सादरीकरण ठरले मुख्य आकर्षण

अमरावती ( २५ डिसेंबर ) : आज जग सर्वत्र धर्म, जाती व पंथावरून विभाजित झाले आहे. द्वेष, ईर्षा व कलह वाढत आहे. अशा परिस्थितीत जगाला प्रभू येशूच्या शांती व प्रेमाची खऱ्या अर्थाने गरज आहे. येशूच्या विचारांचे आचरण केल्यास निश्चितच पृथ्वीतलावर प्रेम, सुख, शांती नांदू शकते. त्या काळात जगात सगळीकडे हाहाकार माजल्यामुळेच प्रभू येशूंनी जन्म घेतला होता. दुर्दैवाने आजही तीच परिस्थिती आहे. भगवान येशू धर्म संस्थापक नव्हते, किंवा एका धर्मापुरते मर्यादित नव्हते जगाला प्रेम, शांती व अहिंसेचा संदेश देण्यासाठीच त्यांचा जन्म झाला होता. त्यांचा हा महान संदेश युगानुयुगे टिकणारा आहे. आज संपूर्ण जगात सगळीकडे कलह, द्वेष व भांडण तंटे सुरू आहेत. अशा प्रसंगी शांती आणि समेट हा प्रभू येशूचा संदेश खूप महत्त्वाचा आहे. देव आणि मानव यांच्यातील दुरावलेले संबंध पुन्हा जुळावे यासाठी येशूने जन्म घेतला होता. जेव्हा समेट घडेल तेव्हाच लोक एकमेकांवर प्रेम करू लागतील आणि आपोआपच जगात शांती, प्रेम, आनंद व प्रीती नांदेल. याशिवाय आज प्रभू येशूचे विचार व शिकवण लहान मुलांमध्ये रुजविण्याची आवश्यकता आहे. तरच भारतासह जगभर सुजाण नागरिक घडू शकतील. आज देशभरात नाताळ सणाचा आनंदोत्सव साजरा होत आहे. हा सण फक्त ख्रिस्ती बांधव नाही तर जगभरात सर्वच जण उत्साहात साजरा करतात. नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी मुख्यत्वे २५ डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो. भगवान येशू यांनी आपल्या सर्वांना उन्नतीचा मार्ग दाखविला. भगवान येशू यांच्या जन्माचे औचित्य साधून चर्चमध्ये प्रार्थना करण्यात येत आहे. ख्रिस्ती बांधव या विशेष उपासनेसाठी आवर्जून उपस्थित राहतात. आनंदाचे क्षण वेचणारा सण साजरा होत असलेल्या या नाताळ म्हणजेच ख्रिसमस सणानिमित्त मी आपणास सर्वांना या पावन पर्वावर शुभेच्छा देते. असे प्रतिपादन आमदार सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी प्रभू येशू ख्रिस्त यांच्या जन्मदिन सोहळ्यात उपस्थितांना संबोधून केले.

अमरावती स्थित इर्विन चौक समीपस्थ सेंट फ्रान्सिस झेव्हीअर चर्च येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी फादर रमसीन, फादर ख्रिसलर, फादर लॉरेन्स, फादर ओनील, पोलीस आयुक्त-नविनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त-सागर पाटील, सुरेश रतावा आदी उपस्थित होते. प्रभू येशू ख्रिस्त यांच्या जन्माचे औचित्य साधून यावेळी चर्चमध्ये उपस्थित अतिथी मान्यवरांचे सह सर्व धर्मबांधव व धर्मभगिनींनी विशेष उपासनेसह प्रार्थना केली. यादरम्यान लहान मुलांच्या वतीने सुरेल आवाजात कॅरॉल म्हणजे अर्थातच येशूच्या जन्माच्या गाण्यांचे अप्रतिम असे सादरीकरण केले. रोमन कालगणनेनुसार २५ डिसेंबर ही तारीख हिवाळ्यातील संक्रांत अथवा अयनकाळाचा दिवस आहे. प्रतिकात्मक कारणासाठी भगवान येशू यांनी आपल्या जन्मासाठी हा सर्वात छोटा दिवस निवडला अशी धारणा आहे. प्राचीन धर्मोपदेशक-ऑगस्टाईन यांनी नोंदविले आहे की आपल्या पृथ्वीय अनुमानानुसार भगवान येशू सर्वात छोट्या दिवशी जन्माला आले. तरीही त्यामागील उदात्त आशय असा आहे की त्या दिवसानंतर पुढे दिवस मोठा होत जातो. त्यामुळे भगवान येशू आपल्यासाठी लीन झाले आणि त्यांनी आपल्या उन्नतीचा मार्ग आपल्याला दाखविला. कारण यानंतरच्या दिवसांमध्ये सूर्य अधिक काळ प्रकाश देत राहतो. या जन्माच्या स्मरणाचे औचित्य साधून फादर रमसीन यांनी आपल्या संबोधनात प्रभू येशू ख्रिस्त यांनी संपूर्ण जगाला प्रेम-अहिंसा-शांतीचा संदेश दिल्याचे सांगितले.याप्रसंगी फादर रमसीन यांनी आमदार सौ. सुलभाताई खोडके यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यासोबतच यादरम्यान सेंट फ्रान्सिस झेव्हीअर चर्चच्या वतीने सर्व अतिथी मान्यवरांचे यथोचित स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी सर्व उपस्थितांना ख्रिसमस सणाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा दिल्या.

संत फ्रान्सिस झेव्हीअर महामंदिर परिसरात या निमित्ताने प्रभू येशूंच्या जन्माची सुवार्ता दर्शविणारे फलक व गाईचा गोठा यांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या होत्या. ज्यामुळे प्रभू येशूंचा जन्म गरीब परिस्थितीत कशा प्रकारे झाला. असे दृश्य दर्शविणारी प्रतिकृती यावेळी बोलकी ठरल्याचे चित्र याप्रसंगी दिसून आले. याप्रसंगी पोलिस आयुक्तालय अमरावती शहर व राष्ट्रीय एकता मंच चे मान्यवरांचे वतीने सुद्धा यादरम्यान नाताळ सणाच्या निमित्ताने सर्व उपस्थितांना शुभेच्छा देण्यात आल्यात. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रेमंड सर यांनी केले. सर्व धर्मभगिनींसह बांधव व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *