आठ महिन्यानंतर अमरावतीत आढळला पहिला कोरोना रुग्ण

जिल्हा शल्य चिकित्सकांचे खबरदारीचे आवाहन

अमरावती जिल्ह्यात तब्बल आठ महिन्यानंतर एका कोरोनाग्रस्ताची नोंद झालेली आहे. धामणगाव येथील २१ वर्षीय तरुण येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल होता. त्याचा अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे आता जिल्ह्यात ५ मे २०२३ नंतर पहिल्यांदा कोरोना संक्रमितांची नोंद झाली आहे. हा नमुना आता जिनोम सिक्केसिंगसाठी पाठविण्यात येणार आहे.

कोरोनाची लागण झालेला धामणगाव तालुक्यातील हा रुग्ण आहे. अन्य आजारासाठी तो सुपर स्पेशलिटी रुग्णालयामध्ये दाखल होता. या रुग्णाची प्रवासाची पाश्र्वभूमी नसली तरी त्याच्या संपर्कातील लोकांचे नमुने आता आरोग्य विभागकडून घेण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेमार्फत एकूण नऊ नमुने तपासणीला पाठविण्यात आले होते. त्यामध्ये एक नमुना पॉझिटिव्ह नोंदविला आहे. हा नमुना आता जिनोम सिक्केसिंगसाठी पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर हा कोणता व्हेरिएंट आहे, याची माहिती मिळणार असल्याची माहिती विद्यापीठ स्थित कोरोनो टेस्टिंग लॅबचे समन्वयक डॉ. प्रशांत ठाकरे यांनी दिली.

धामणगाव येथील २१ वर्षीय तरुणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वॉर्ड क्रं.10 मध्ये उपचार सुरु आहेत. रुग्णालयात चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. तर नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *