भारताच्या राज्यघटनेने सामाजिक क्रांती आणि त्यासाठी लोकशाही मार्ग वापरण्याचे बळ दिले आहे – आ. सौ. सुलभाताई खोडके

विनायक विद्या मंदिर, विनायक विधी महाविद्यालय व विनायक गुरुकुल येथे ७५ वा प्रजासत्ताक दिन सोहळा थाटात

अमरावती २७ जानेवारी :- आज,२६ जानेवारीला आपली घटना पंचाहत्तराव्या वर्षात प्रवेश करीत आहे.आपल्या घटनेबरोबर जन्माला आलेल्या अनेक देशांच्या राज्य घटनांना पाच वर्षेही पाहता आली नाहीत. आपली घटना मात्र अनेक आव्हानांना तोंड देत अमृतकाळात प्रवेश करते आहे. घटनेच्या प्रस्तावनेत ‘लोकशाही प्रजासत्ताक’ असा शब्द आला आहे. लोकशाही बहुमत हे हक्कांना वरचढ असते. पण प्रजासत्ताकात अल्पसंख्याकांच्याही हक्कांचे रक्षण होते. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना हा फरक ज्ञात होता. ‘लोकशाही’ या शब्दाआड दडलेले धोके ओळखून त्यांनी ‘डेमोक्रॅटिक रिपब्लिक’असा शब्द वापरला. बहूविधता हा लोकशाहीचा आत्मा आहे. भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना ही तिच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक तत्वप्रणालीची गुरुकिल्ली आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व यावर आधारित समाजवादी, धर्मनिरपेक्ष सरकारची हमी हे तत्व देते. भारताच्या राज्यघटनेने सामाजिक क्रांती आणि त्यासाठी लोकशाही मार्ग वापरण्याचे आश्वासन दिले आहे. असे प्रतिपादन आमदार सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी ७५ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना संबोधून केले. शुक्रवार दिनांक २६ जानेवारी रोजी प्रवीण खोडके मेमोरियल ट्रस्ट द्वारे संचालित विनायक विद्या मंदिर, विनायक विधी महाविद्यालय व विनायका गुरुकुल येथे आयोजित गणतंत्र दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. पद्माकर टाले, विनायक विधी महाविद्यालय प्राचार्य डॉ. अंशुमालिका श्रीवास्तव, विनायक गुरुकुल संचालक रेखा सुर्वे, प्रवीण खोडके मेमोरियल ट्रस्टचे संचालक यश खोडके आदी उपस्थित होते. सर्वप्रथम अतिथी मान्यवरांचे हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्वर्गीय विनायकराव खोडके यांच्या प्रतिमेचे पूजन-वंदन व माल्यार्पण तसेच दीप प्रजवलन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थितांच्या वतीने राष्ट्रध्वज तिरंगाला सलामी देण्यात आली. तदनंतर आमदार सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सामूहिक राष्ट्रगीता द्वारे उपस्थितांच्या वतीने राष्ट्राप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यादरम्यान भारत माझा देश आहे. या प्रतिज्ञेच्या वेळी सर्वांनी एक स्वरात सहभाग नोंदवला होता. याप्रसंगी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. याप्रसंगी आमदार सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते विनायक गुरुकुलच्या यशवंत-गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. यादरम्यान विनायक विद्या मंदिर व विधी महाविद्यालयीन प्राध्यापकांचा सुद्धा त्यांच्या गौरवादायी कामगिरीबद्दल त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. स्वनय जुननकर या विद्यार्थ्याने भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने यावेळी परिपूर्ण माहिती दिली. याप्रसंगी शो-मार्च मध्ये निकुंज दर्यापूरकर, प्रणित दरणे यांनी सहभाग नोंदवला होता. तसेच परेड मध्ये परेड कमांडर रुचित ठाकरे, हाउस कॅप्टन कपिल नागवानी, अंशीता नांदगावे, गीतिका सेंगर, अर्णव बनसोड, इशिका अवसरे, इशिका बुंदीले यांनी सहभाग नोंदवला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. शीतल काळे, अवंतिका इंगोले, यश खेडकर, अथर्व गवई यांनी केले. तर कार्यक्रमाअंती सर्व उपस्थितांचे जानव्ही गडलिंग यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *