महिलांचे सक्षमीकरण हे एक चांगले राष्ट्र निर्माण करण्याची पूर्वअट आहे – आमदार सौ.सुलभाताई खोडके

  • जागतिक महिला दिन सांस्कृतिक कार्यक्रम २०२४
  • सावित्रीबाई फुले महिला मंडळ,अमरावती चे वतीने भव्य आयोजित कार्यक्रमात स्त्री ऐक्याचा महिला भगिनींनी केला निर्धार
  • रामजी की झाकी,भारुड,एकल व समूह नृत्य सादरीकरण ठरले मुख्य आकर्षण

जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत बरोबरीने महिलांच्या सर्वांगीण सर्वसमावेशक विकासाला चालना दिली तरच त्यांच्या अनेक समस्यांचे निराकरण होईल. त्यांना समानतेची वागणूक, त्यांच्यावरील अत्याचाराची वेळीच तड, रोजगारात आणि मोबदल्यात भेदाभेद टाळली तर त्यांचा प्रगतीला गती मिळेल. कोव्हीड काळानंतर दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहाने जगभर साजरा होत असतो. महिला दिन म्हणजे केवळ एक प्रसंग नसून त्या-त्या देशातील महिलांच्या विकासाची गती तपासण्याचाही दिवस आहे.महिलांच्या हक्काच्या रक्षणाचा आणि संवर्धनाचा लेखाजोखा घेऊन नवीन धोरणे आखण्याचाही दिवस आहे. ८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन. जगभरातील महिलांच्या कर्तृत्वाचा हा दिवस आहे. युनायटेड नेशन च्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची २०२४ ची थीम आहे इंस्पायर इन्कलूजन ज्याचा अर्थ आहे प्रत्येकाला समान हक्क आणि सन्मान . भारताची लोकशाही शासन व्यवस्था ही स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यावर आधारित आहे. महिलांचे सक्षमिकरण हे एक चांगले राष्ट्र निर्माण करण्याची पूर्वअट आहे.,जेव्हा महिलांचे सक्षमीकरण केले जाते, तेव्हा स्थैर्य असलेला समाज निश्चित होतो.महिलांचे सक्षमीकरण आवश्यक आहे, कारण त्यांच्या मूल्य प्रणालीमुळे चांगले कुटुंब, समाज आणि शेवटी एक राष्ट्र विकसित होते. आदरणीय एपीजे अब्दुल कलाम माजी भारतीय राष्ट्रपतींचे हे कोट आपल्यातल्या समाजातल्या स्त्रियांच्या भूमीकेची आठवण करून देते.मानवी समाजाला एक वाहन मानले तर ‘ स्त्री-पुरुष ‘ ही त्याची दोन चाके आहेत.दोन्ही निरोगी आणि मजबूत असणे आवश्यक आहे. संपूर्ण जगाच्या लोकसंख्येपैकी महिलांचं प्रमाण जवळपास निम्मं आहे. भारतीय राज्य घटनेत महिलांना पुरुषांप्रमाणे समान अधिकार देण्यात आले आहे.वर्तमान काळात महिलांना या जगात समान पातळीवर स्पर्धा करण्याची संधी उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. तंत्रज्ञान, औद्योगिकरणाच्या व डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात आपल्या अंगीभूत कौशल्याचे बळावर महिला भगिनींनी शिक्षण, कला, विज्ञान, राजकारण ते अंतराळापर्यंत आपल्या कर्तृत्वाची छाप पाडली आहे. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदींसह अन्य थोर महिलांच्या जीवन कार्यापासून प्रेरणा घेऊन कर्तृत्व आणि सामर्थ्य याचा मेळ साधित आपल्या सांसारिक प्रपंचाचा डोलारा यशस्वीपणे सांभाळीत कुठल्याही भेदभावाला थारा न देता आज भारतीय महिला आपल्या कार्यकर्तृत्वाचा परिचय देऊन अविरतपणे वाटचाल करीत आहे. स्त्री सन्मान-सशक्तीकरण होण्यासोबतच महिला भगिनींची सुरक्षा होणे गरजेचे आहे.उपरोक्त प्रतिपादन आमदार सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी जागतिक महिला दिन सांस्कृतिक कार्यक्रम २०२४ कार्यक्रम प्रसंगी उपस्थितांना संबोधून केले.शुक्रवार दिनांक ८ मार्च २०२४ रोजी सावित्रीबाई फुले महिला मंडळ द्वारे आयोजित पंचवटी चौक परिसर समीपस्थ मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात आयोजित कार्यक्रमात त्या उदघाटक म्हणून बोलत होत्या.यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानीअमरावती मध्यवर्ती कारागृह अधीक्षक-श्रीमती कीर्ती चिंतामणी तर प्रमुख अतिथी म्हणून स्त्रीरोग तज्ञ-डॉ. जयश्री बोराडे, स्वागताध्यक्ष-अनिता खवले, जयश्री लोखंडे, जयश्री कुबडे, डॉ. कल्पना लांडे, डॉ. सुप्रिया लढके, किरणताई मेहरे आदी उपस्थित होते. सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे आ. सौ. सुलभाताई खोडकेसह अन्य मान्यवरांचे हस्ते पूजन-वंदन व माल्यार्पण करण्यात आले. यादरम्यान सावित्रीबाई फुले महिला मंडळ व कार्यक्रमाच्या आयोजन समितीच्या वतीने संचालिका-शिल्पाताई गहूकार व महिला सहकारी भगिनींच्या वतीने आमदार-सौ. सुलभाताई खोडके तसेच श्रीमती-किर्तीताई चिंतामणी यांचे स्वागत व स्नेहील सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आमदार सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते किरणताई भेले, डॉ. ऐश्वर्या मडघे, राजश्री जठाळे, अरुणा चौधरी, शुभांगी ढवळे, कल्पना कुराडे, निलिमा पाटील, उज्वलाताई लंगडे या सत्कारमूर्तींचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ,’ मै मेरी झांसि नही दूगी असे इंग्रजांना ठणकावून सांगून जीवनात संघर्ष करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई. मुलींना व स्त्रियांना शिक्षणाची द्वारे खुली करून देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अशा सर्व महान स्त्रियांच्या कार्याला याप्रसंगी उपस्थितांच्या वतीने मानाचा मुजरा करण्यात आला.

यादरम्यान श्री गणेश वंदना, भारतीय संस्कृतीचे संवर्धनासाठी व जतन करण्यासाठी सुसंस्कारित पिढी घडली पाहिजे याकरिता अनोखा संदेश देणारे भारुड, विविध मनमोहक आकर्षक अशी नृत्यांची एकापेक्षा एक सरस अशी मालिका, प्रभू श्रीरामचंद्र यांच्या जीवनकार्यावर आधारित रामजी की झाकी आदींसह साकारण्यात आलेल्या सादरीकरण व कलाकृतींना उपस्थितांच्या वतीने टाळ्यांच्या गजरात दाद देण्यात आली.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन-पूनम कांडलकर व मेहरे मॅडम यांनी तर प्रास्ताविक -स्मिता गणोरकर यांनी केले. कार्यक्रमाअंती सर्व उपस्थितांचे शीतल इंगळे यांनी आभार मानले. याप्रसंगी सावित्रीबाई फुले महिला मंडळाचे सर्व सदस्य व पदाधिकारी तसेच आमंत्रित सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *