आ. सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते विकासाच्या महापर्वाचे भूमीपूजन

  • पीडीएमसी प्रभागात १ कोटींच्या मूलभूत सुविधांच्या विकास कामांचा कार्यारंभ
  • मूलभूत सुविधांच्या पूर्ततेतून मिळेल शाश्वत विकासाला बळकटी – आ.सौ. सुलभाताई खोडके

अमरावती ०९ मार्च : विकासाच्या संकल्पनेत मूलभूत विकास व मानवविकास असे दोन पैलू असतात. आजच्या आधुनिक युगात नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सुसज्ज रस्ते, मुबलक व नियमित पाणी पुरवठा, वीज, सौंदर्यीकरण, सांडपाण्याची व्यवस्था आदींची पूर्तता होणे जरुरीचे आहे. तर समाजाचे प्रश्न निकाली काढून विविध लाभांच्या व कल्याणकारी योजनांची पूर्तता करून मानव विकास सुद्धा करणे गरजेचे आहे. हाच विकासाचा नियोजित कृती आराखडा प्रत्यक्षात साकारण्यासाठी आपला प्रयत्न असून मागील चार वर्षात विकास कामांची मालिका राबविण्यावर आपला भर राहिला आहे. शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता शहरी क्षेत्रात पायाभूत सुविधांची उपलब्धी करतांना जनसामान्यांच्या समस्यांचे तत्परतेने निराकरण करण्यासह नागरिकांना अपेक्षित विकास कार्यक्रम राबविण्याचे धोरण सुद्धा अवलंबिल्या जात आहे. शहर सौंदर्यीकरणाची कामे गतीने पूर्ण होत असतांना त्यात सर्वसामान्य जनतेची मिळणारी साथ मोलाची व नवी ऊर्जा देणारी ठरत आहे. जनतेचा आशीर्वाद असाच पाठीशी राहिला तर अमरावतीचा कायापालट होवून शहराचा चेहरा -मोहरा बदलण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचा विश्वास आमदार अमरावती विधानसभा मतदार संघाच्या आमदार सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी व्यक्त केला.

अमरावती महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक २ पीडीएमसी परिसरात १ कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आ. सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार महोदयांनी कुदळ मारीत व विकास कामांच्या नामफलकाचे अनावरण करून भूमिपूजनाची औपचारिकता साधली. पीडीएमसी प्रभागांतर्गत रहिवासी भागात मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने स्थानिक भागातील नागरिकांना प्रचंड दुरवस्थेला व अडचणींना सामोरे जावे लागत होते. या संदर्भात नागरिकांनी निवेदन देऊन अवगत केले असता आ.सौ.सुलभाताई खोडके यांनी तात्काळ दखल घेत मूलभूत सुविधांची कामे मार्गी लावली. याबद्दल स्थानिक नागरिकांच्या वतीने त्यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली . गेल्या अनेक वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या भागात आता विकासाची लहर आल्याने आगामी काळातही आमदार महोदयांना आपली साथ राहणार असल्याचा विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला.

विकासाच्या या शृंखलेत १ कोटी १ लक्ष ८४ हजार इतक्या विकास कामांतर्गत प्रभाग क्रमांक २ पीडीएमसी प्रभागातील केशर कॉलनी , तपोवन गेट पासून ते उज्जेनकर मास्टर पाटील यांच्या किराणा दुकानापर्यंत रोडचे पूर्व -दक्षिण बाजु कडून पक्की नाली बांधकाम करणे २२.०८ लक्ष , मीनाक्षी कॉलनी मधील रस्त्याचे डांबरीकरण व नाली बांधकाम करणे १५.९९ लक्ष , संकेत कॉलनी तपोवन येथील ओपन स्पेस ला चेनलिंग फेन्सिंग करणे २०.३५ लक्ष , अजमिरे लेआऊट , मोहनदीप कॉलनी येथे नाली व सीडी वर्क्स चे बांधकाम करणे , ७.८५ लक्ष , अजमिरे ले आऊट , गोविंद नगर आणि माँ भागवती विहार येथे नालीचे बांधकाम करणे ७.८७ लक्ष , गोविंद नगर – मोहनदीप कॉलनी येथे श्री. शेळके ते नाला पर्यंत नालीचे बांधकाम करणे ६.७६ लक्ष , गोविंद नगर , मोहनदीप कॉलनी आणि माँ भागवती विहार येथे रस्त्याचे खडीकरण करणे , ७.९९ लक्ष , अजमिरे ले-आऊट , दत्त विहार आणि हरिहर कॉलनी येथे रस्त्याचे खडीकरण करणे ६.७८ लक्ष , हरिहर कॉलनी येथे श्री धावड ते कथलकर ते बोबडे यांच्या घरासमोर ते नाल्यापर्यंत रस्त्याचे खडीकरण करणे ६.१७ लक्ष .अशी विकास कामे करण्यात येणार असून प्रभागाचा चेहरा मोहरा बदलून विकासाचे महापर्व नांदणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *