यवतमाळात गॅस सिलिंडरचा स्फोट, चार घरांना आग

यवतमाळ : गॅस सिलिंडर लीक झाल्याने शनिवारी दुपारी दीड वाजता लागलेल्या आगीत येथील पिंपळगाव परिसराच्या रोहिलेबाबा नगरातील चार घरांची राखरांगोळी झाली. झोपडीवजा घरांसह त्यातील साहित्याचा कोळसा झाला. अतिशय गरीब कुटुंबाची ही घरे आहेत. त्यांच्यापुढे मोठे संकट उभे ठाकले आहे.

धामणगाव मार्गावरून पिंपळगावकडे जाणाऱ्या या नगरात लोकांची सर्व कामे सुरळीत सुरू असताना एका घरात गॅस सिलिंडर लीक झाल्याने आग लागली. पाहता पाहता आगीने चार घरे आपल्या कवेत घेतली. या भागातील नागरिकांनी मिळेल त्या साधनांद्वारे आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. अग्नीशमन दल दाखल झाल्यानंतर ही आग नियंत्रणात आणण्यात आली. वृत्त लिहिस्तोवर या घटनेत किती नुकसान झाले याची मोजदाद सुरू होती. त्यामुळे नुकसानीचा तूर्तास अंदाज बांधण्यात येत नाही. मात्र, आगीमुळे गरिब कुटुंबीयांना मोठा मनस्ताप आणि आर्थिक भुर्दंड सहन करावे लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *