शनिवारी 8 मृत्यू, 640 नवे रुग्ण, अमरावती जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत 503 मृत्यू

अमरावती,
जिल्ह्यात गेल्या दहा महिन्यात कोरोनामुळे 503 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रथम मृत्यूची नोंद झाली होती. आताही कोरोनाचा उद्रेक कायम असल्यामुळे शनिवारी एकाच दिवशी पुन्हा 8 रुग्णांचा मृत्यू झाला तर 640 नवीन रुग्णांची नोंद झाली. 498 रुग्ण बरे होऊन घरी गेले. गेल्या 30 दिवसात 13 हजार 225 रुग्ण बाधित आणि 88 मृत्यू झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 34 हजार 225 कोरोनाग्रस्त झाले आहे. त्यापैकी 4866 रुग्ण क्रियाशील असून त्यातील 2 रुग्णांना नागपुरात हलविण्यात आले तर 3447 गृह विलगीकरणात आहे. उर्वरित कोविड रुग्णालयात उपचार घेत आहे. आजपर्यंत 28 हजार 856 रुग्ण बरे झाले आहे. त्याचे प्रमाण घसरले असून 84.31 टक्क्यांवर आले आहे. जिल्हा शल्य चिकीत्सकांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पुन्हा 8 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात अमरावतीच्या प्रसाद कॉलनी येथील 73 वर्षीय पुरुष, जीवन ज्योती कॉलनी येथील 53 वर्षीय पुरुष, जवाहर नगर येथील 50 वर्षीय पुरुष, सारडा नगर येथील 75 वर्षीय, साई नगर येथील 79 पुरुष, राजापेठ येथील 75 पुरुष, गुरुदेव नगर मोझरी येथील 79 पुरुष, पुसद येथील 65 वर्षीय महिलेचा त्यात समावेश आहे. आतापर्यंत 503 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तो दर 1.47 टक्के आहे. नव्याने बाधित झालेल्या 640 रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले असून त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू झाला आहे. गेल्या मार्च महिन्यापासून आतापर्यंत 2 लाख 21 हजार 760 जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यापैकी 34 हजार 225 जणांचे अहवाल सकारात्मक आले आहे.
 
नेहरू मैदान केंद्र सायंकाळीही सुरू राहणार
अमरावती शहरातील नेहरू मैदानावरील महापालिकेच्या शाळेतील आरटीपीसीआर चाचणी केंद्र आता नागरिकांच्या सुविधेसाठी सायंकाळी पाच ते रात्री नऊ या वेळेतही सुरू राहील, अशी माहिती मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली. तसेच शहरातील बाधितांची संख्या लक्षात घेऊन विलासनगरातील मनपा शाळा क्र.17, बडनेरा पोलिस ठाण्यामागील मनपा शाळेच्या परिसरात रॅपिड अँटिजेन व आरटीपीसीआर केंद्र सुरू असल्याची माहिती पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ.विशाल काळे यांनी दिली. शहरात कोरोनाबाधित मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. त्यामुळे गर्दी टाळलीच पाहिजे. अनेकदा स्मशानभूमीतही गर्दी होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त 10 व्यक्तींनीच जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
 
 
 
चाचणी कीट व औषधांचा पुरेसा साठा ठेवा
कोरोना साथीच्या नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाव्दारे विविध उपाययोजना होत असताना बाधितांवर तत्काळ उपचार होण्यासाठी आरटीपीसीआर कीट, रॅपीड अ‍ॅन्टीजेन कीट व ऑक्सीजन या घटकांचा पुरेसा साठा उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शनिवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देऊन औषधीसाठा व इतर सुविधांबाबत तपासणी केली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, अति. जिल्हा शल्य चिकित्सक सतिश हुमणे यांच्यासह आरोग्य अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. कोरोनामुक्त झालेल्यांनी प्लाझ्मादानासाठी पुढे येण्याचे आवाहनही त्यांनी केले. जिल्ह्यात प्लाझ्मादानाबाबत यंत्रणा यापूर्वीच कार्यान्वित करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *