उत्पादन निर्देशांक वेबपोर्टल औद्योगिक क्षेत्रासाठी उपयुक्त ठरेल – वित्त व नियोजन मंत्री अजित पवार

अमरावती जिल्ह्यातील 568 कारखान्यांची होणार नोंद

अमरावती, दि. 29 : महाराष्ट्र हे देशातील औद्योगिकदृष्ट्या अग्रेसर राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनामध्ये तसेच एकुण उत्पन्नामध्ये राज्याचा हिस्सा मोठा आहे. राज्यस्तरीय उत्पन्न काढणे, देशाची तथा राज्याची औद्योगिक प्रगती मोजण्यासाठी व त्यानुषंगाने नियोजन करणे या अत्यंत महत्वपूर्ण बाबीसाठी औद्योगिक उत्पादन निर्देशांक तयार करणे गरजेचे असते. त्यासंबंधीचे वेब पोर्टल औद्योगिक क्षेत्रासाठी उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी आज केले.

अर्थ व सांख्यिकी संचालनालय व उद्योग संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने औद्योगिक उत्पादन निर्देशांक तयार करणाऱ्या वेब पोर्टलचे उद्घाटन उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. उद्योग मंत्री सुभाष देसाई, नियोजन व वित्त राज्यमंत्री शंभुराजे देसाई, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे, नियोजन विभाग व उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव, केंद्रिय सांख्यिकी कार्यालयाचे अधिकारी, उद्योग आयुक्त, अर्थ व सांख्यिकी संचालक, इंडस्ट्री अशोसिएशनचे प्रतिनिधी, अर्थ व सांख्यिकी संचालनालय व उद्योग संचालनालयाचे सर्व अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते. अमरावती येथून जिल्हा सांख्यिकी अधिकारी दिनेश बिजागरे हे उपस्थित होते.

अमरावती जिल्ह्यातील 568 कारखान्यांची नोंद

अमरावती जिल्ह्यातील 568 कारखान्यांकडून दरमहा विहित कालावधीत माहिती वेब पोर्टलवर नोंदविण्याची जबाबदारी उद्योग संचालनालयाच्या महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र यांचेवर सोपविण्यात आली आहे. वेब पोर्टलवर प्राप्त होणाऱ्या माहितीवर संस्करण करुन राज्याचा औद्योगिक निर्देशांक अर्थ व सांख्यिकी संचालनालयाव्दारे प्रकाशित केला जाणार आहे.

राष्ट्रीय व राज्यस्तरीय उत्पन्न काढणे, देशाची व राज्याची औद्योगिक प्रगती मोजण्यासाठी व त्यानुषंगाने राज्याच्या उत्पनांचे नियोजन करणे यासाठी औद्योगिक उत्पादन निर्देशांक तयार करणे अत्यंत महत्वाचे असते. उद्योग जगाला तसेच उद्योग क्षेत्रात संशोधन, उत्पादन करणाऱ्या संस्थांना या निर्देशांकाची नेहमी आवश्यकता भासते. त्यामुळे आर्थिक चढाओढीचे अंदाज व नियोजन करण्यासाठी औद्योगिक उत्पादन निर्देशांक ही संज्ञा महत्वाची आहे. त्याचे वेबपोर्टल उद्योग क्षेत्रासाठी महत्वपूर्ण ठरेल, असे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या मार्गदर्शक सुचनाप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाच्या अधिपत्याखालील अर्थ व सांख्यिकी संचालनालय व उद्योग विभागाच्या अधिपत्याखालील उद्योग संचालनालय, यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यासाठी औद्योगिक उत्पादन निर्देशांक तयार करण्यासाठी वेब पोर्टल तयार करण्यात आले आहे. या वेब पोर्टलचा राज्यासह औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व घटकांना फायदा होईल. राज्यातील सर्व कारखान्यांकडून दरमहा विहित कालावधीत माहिती वेब पोर्टलवर नोंदविण्याची जबाबदारी उद्योग संचालनालयाला सोपविण्यात आली आहे, अशी माहिती श्री. बिजागरे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *