पाकिस्तानपेक्षाही भारताची अवस्था बिकट, मंत्री वडेट्टीवार यांची मोदी सरकारवर टीका

अमरावती, 
मोदी सरकारच्या काळात भारताची आर्थिक स्थिती पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ पेक्षाही बिकट झाली असल्याची टीका राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी रविवारी आयोजित पत्रकर परिषदेत केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्त्याने त्यांनी अमरावतीत पत्रकारांशी संवाद साधला. पुढे ते म्हणाले, पंडित जवाहरलाल नेहरूंपासून तर डॉ. मनमोहन सिंह पंतप्रधान असेपर्यंतच्या 70 वर्षाच्या काळात भारताचा विकास झाला आणि मोदींच्या सात वर्षाच्या कालखंडात देश बरबाद झाला आहे. काँग्रेसने जी नवरत्ने देशात विकसित केली, त्यांची विक्री करण्याचा उद्योग मोदी सरकारने केला आहे. ज्या विमानतळाला सरदार वल्लभभाई पटेल नावाने ओळख हाती ते विमानतळ आता अदाणीला विकण्यात आले. कोरोना देशात येताच तज्ज्ञांनी लॉकडाऊन लावण्याचा सल्ला दिला होता.

मात्र, नरेंद्र मोदी ट्रम्प यांच्या स्वागताच्या तयारीत गुंतले होते. परिणामी देशात कोरोनाची पहिली लाट आली. दुसऱ्या लाटेच्या वेळी नरेंद्र मोदी पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत व्यस्त झाले. त्यांच्या अशा धोरणांमुळे देशांत कोरोनाची दुसरी लाट ही जीवघेण्या स्वरूपात आली असून त्यांच्या मनमर्जी कारभारामुळे देशात अनेकांना प्राण गमवावे लागले आहे. लसीचे नियोजनही मोदींनी चुकविले. देशातल्या नागरिकांना पाहिले लस देण्याऐवजी मोदी यांनी विदेशात लस पाठविली. परिणामस्वरूप आपल्या येथे टंचाई निर्माण झाली. मोदी सरकार सर्व आघाड्यावर अपयशी ठरल्याची टीका त्यांनी केली. पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, शहराध्यक्ष बबलू शेखावत, आ. बळवंत वानखडे, आ. सुलभा खोडके, माजी आमदार वीरेंद्र जगताप, हरिभाऊ मोहोड यांच्यासह अन्य मंडळी काळ्या फिती लावून उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *