नववर्षाच्या स्वागतासाठी राज्यभरातील पर्यटक चिखलदऱ्यात दाखल

अमरावती – आडवळणाचा रस्ता, सर्वत्र हिरवळ, मोठमोठ्या पर्वतरांगा, या अदभूत निसर्गरम्य वातावरणाचा आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी तसेच नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांच्या गर्दीने विदर्भाचा काश्मीर म्हणून ओळखल्या जाणारं चिखलदरा फुलून गेले आहे. सध्या राज्यात थंडीची लाट सुरू असून चिखलदरामध्ये थंडीने उच्चांक गाठला आहे. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी राज्यभरातून पर्यटक चिखलदऱ्यात दाखल होत आहेत. चिखलदरामध्ये उंच पहाडावर असलेली घोडा सवारी, उंटसवारी, सायकल सवारी, त्याचप्रमाणे जंगल सफारी यामुळे पर्यटकांची पसंती देवी पॉइंटला दिसून येत आहे.

सध्या राज्यभरात काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. त्यातच चिखलदरा हे थंड वातावरण असलेल पर्यटन स्थळ आहे. त्यामुळे चिखलदरात थंडीने उच्चांक गाठला आहे. थंडीमुळे चिखलदराचे सौंदर्य आणखी फुलले आहे. दूरवर पसरलेली धुक्याची चादर, श्वास रोखून धरायला लावणाऱ्या पर्वत रांगा, हजारो फूट उंचीवरून कोसळणारे धबधबे, नागमोडी रस्ते, वातावरणात गारवा, हाड गोठवणारी थंडी आणि समोर पेटलेली शेकोटी, अशी काहीशी विलोभनीय दृश्य सध्या मेळघाटात बघायला मिळत आहे.

निसर्गात असलेली अद्भुत किमया येथे येऊन अनुभवतो, असे पर्यटक सांगतात. चिखलदरात विविध पाहण्याजोगे स्थळ आहेत. मात्र, येथील प्रसिद्ध देवी पॉईंट तर अक्षरशः गर्दीने फुलून गेला आहे. उंच पहाडावर असलेली घोडा सवारी, उंट सवारी, सायकल सवारी यामुळे पर्यटकांची पसंती देवी पॉईंटला अधिक दिसून येते. तर, देवी पॉईंट लगत असलेल्या तलावावर बोटिंगचा आनंद घेताना पर्यटक दिसत आहे. समुद्र सपाटीपासून हजारो किलोमीटरवर असलेला चिखलदरा पर्यटकांना भूरळ पाडत आहे. सोबतच जवळच असलेले सेमाडोह आणि जंगलातील हत्ती सफारीसाठी प्रसिद्ध असलेल्या कोलकास येथे जाऊन पर्यटक निसर्गाचा मनमुराद आनंद घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *