” विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान डाँ. पंजाबराव देशमुख” -प्रा. अरूण बुंदेले.

” श्री शिवाजी हायस्कूल,भानखेडा येथे डॉ.पंजाबराव देशमुख जयंत्युत्सव उत्साहात “

अमरावती । डाँ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान आहेत.भाऊसाहेब प्राथमिक,माध्यमिक व उच्च शिक्षण घेत असताना शिक्षक, प्राध्यापकांना ते त्यांच्या अंगी असलेल्या अभ्यासविषयक जिद्द, चिकाटी, सातत्य, दृढनिश्चय ,आत्मविश्वास व महत्वाकांक्षा या गुणांमुळे आवडायचे. या सद्गुणांमुळेच भाऊसाहेब जीवनात यशस्वी झाले.ज्ञानमहर्षी, शिक्षणमहर्षी, कृषिमहर्षी, लोकमहर्षी, अस्पृश्योद्धारक, कर्मयोगी व युगद्रष्टा सत्यशोधक झाले.आजच्या विद्यार्थ्यांनी भाऊसाहेबांच्या या सद्गुणांपासून प्रेरणा घेऊन स्वत:चे व समाजाचे जीवन उज्ज्वल करावे. असे प्रतिपादन प्रमुख वक्ते प्रा.अरुण बा. बुंदेले यांनी केले. ते श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती द्वारा संचालित श्री शिवाजी हायस्कूल, भानखेडा बु. जि.अमरावती येथे शिक्षण महर्षी डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२३ व्या जयंत्युत्सव व स्नेहसंमेलनाच्या दि.२५ डिसें.२०२१ ला संपन्न झालेल्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख वक्ते पदावरुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत होते.

जयंती उत्सव व स्नेहसंमेलनाचे अध्यक्ष मा. अशोकराव गावंडे (अध्यक्ष,शाळा समिती,श्री शिवाजी हायस्कूल ,भानखेडा), उद्घाटक मा. आर.बी.काळे (माजी मुख्याध्यापक तथा आजीवन सभासद,श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती,प्रमुख वक्ते मा.प्रा.अरुण बा.बुंदेले (सुप्रसिद्ध कवी व लेखक) प्रमुख अतिथी मा.दिवाकरराव देशमुख(आजीवन सभासद,श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती, मा.सौ वनिताताई ठाकरे(सरपंच,भानखेडा बु.), मा. अंबादास वाटाणे (आजीवन सभासद, श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती), मा. सुरेशराव बोंडे (आजीवन सभासद, श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती), मा. नारायणमहिंगे (उपसरपंच, भानखेडा), मा. तुषार पळसकर (पोलीस पाटील,भानखेडा बु.) होते.

अध्यक्ष, उद्घाटक, वक्ते व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख, छ. शिवाजी महाराज, स्व.डॉ.आर.डी.ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करुन दीपप्रज्ज्वलनाने जयंत्युत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. मान्यवरांचे स्वागतगीताने व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. मुख्याध्यापिका कु.एम.बी.निचळ (श्री शिवाजी हायस्कूल,भानखेड) यांनी शाळेत चालणारे विविध शैक्षणिक उपक्रम व शाळेची प्रगती प्रास्ताविकातून सांगितली. सर्व विद्यार्थ्यांनी अप्रतिम नृत्याद्वारे भाऊसाहेबांचे गौरवगीत सादर केले.कार्यक्रमाचे उद्घाटक मा. आर. बी. काळे व मान्यवरांव्या हस्ते रांगोळी, पुष्प, चित्रकला, हस्तकला व डीश डेकोरेशन इ.प्रदर्शनींचे उद्घाटन करण्यात आले

उद्घाटक मा.आर. बी. काळे यांनी आज भाऊसाहेबाच्या शैक्षणिक व सामाजिक विचारांची गरज असल्याचे प्रतिपादन केले. अध्यक्षीय मनोगतातून मा. अशोकराव गावंडे यांनी, शिक्षण महर्षी डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल माहिती दिली व सुंदर आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले. प्रमुख वक्ते प्रा.अरूण बुंदेले यांनी “विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान डाँ.पंजाबराव देशमुख” या विषयासोबतच”आदर्श विद्यार्थी प्रबोधन माले”तील ज्ञानकण सांगून अभ्यासविषयक मार्गदर्शन केले. त्यांच्या वऱ्हाडी गीतांनी विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले. विद्यार्थ्यांना प्रा.बुंदेले यांनी “काँपिमुक्त अभियाना” ची शपथ दिली.
याप्रसंगी श्री अतुल ठाकरे यांनी वर्ग १० वी मध्ये” गणित” विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १०,०००/ चे स्व.श्री भुजंगराव ठाकरे स्मृती पारितोषिक जाहीर केले. तर प्रा.अरुण बुंदेले यांनी वर्ग १० मधून “मराठी” विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान तर्फे ५०००/- चे कै. बाबारावजी वायलाजी बुंदेले स्मृती पारितोषिक जाहीर केले. सत्र २०२०-२१ मध्ये झालेल्या शालांत परीक्षेत प्रथम,द्वितीय व तृतीय येणाऱ्या कु.श्रेया मोहोड,कु.शारदा स्वर्गीये व कु.आचल वासनिक या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रथम क्रमांकासाठी स्व.डॉ.आर.डी.ठाकरेस्मृती पारितोषिक,द्वितीय क्रमांकासाठी स्व.तात्यासाहेब ठाकरे स्मृती पारितोषिक व तृतीय क्रमांकासाठी माजी मुख्याध्यापक मा.श्री अवधूतराव आवारे यांच्यातर्फे रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला.तसेच एन.एम.एम.एस.शिष्यवृत्ती परिक्षेत उत्तीर्ण होऊन वर्ग ९ ते १२ पर्यंत १००० रू.महिना शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेल्या कुणाल संजय भलावी याचा सत्कार करण्यात आला व जिल्हास्तरीय राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेतून राज्यस्तरीय बाल विज्ञान परिषदेकरीता निवड झालेल्या कु.सृष्टी कराळे व कु.प्राची ठाकूर या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व रोख पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *