सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नजीकच्या कोविड सेंटर मध्ये लवकरच १०० खाटांचे रुग्णालय

  • आ.सौ. सुलभाताई खोडके यांच्या सूचनेवरून नियामक समितीच्या बैठकीत मंथन
  • विभागीय आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी पवनीत कौर यांची उपस्थिती

अमरावती २९ मार्च : कोरोनाची साथ तूर्तास मंदावली असली तरी धोका अजून टळला नाही. कोरोनाची संभाव्य चौथी लाट येण्याची शक्यता सुद्धा तज्ञांनी वर्तविली असल्याने यावर दीर्घकालीन उपाय योजना करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने अमरावती स्थित विभागीय संदर्भ सेवा रुग्णालया समीपच्या कोविड सेंटर मध्ये १०० खाटांचे रुग्णालय उभारण्यात यावेत, अशी सूचना आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी केली.

विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती येथील रुग्ण कल्याण समितीची पहिली सभा मंगळवार २९ मार्च २०२२ रोजी नियामक समितीचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त पियुष सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी पवनीत कौर , प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. मंगेश मेंढे आदींसह रुग्ण कल्याण समितीचे सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. या सभेमध्ये सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात मिळणाऱ्या अनुदानासंदर्भात नियोजन करण्यात आले. दरम्यान समितीच्या सदस्य आ. सौ . सुलभाताई खोडके यांनी संभाव्य कोरोनाची चौथी लाट लक्षात घेता तात्पुरत्या कोविड सेंटर मध्ये आवश्यक सुविधांची उपलब्धता करण्यासंदर्भात समितीला अवगत केले. या ठिकाणी कोविड सेंटरचे कक्ष साकारण्यात आले आहे, मात्र परिसरात कंपाऊंड, सांडपाण्याचा योग्य निचरा होण्याची व्यवस्था, स्वच्छता विषयक कामे होणे जरुरी आहे. तसेच स्थापत्य कामाबरोबरच विद्युतीकरणाची कामे सुद्धा तातडीने होणे गरजेचे आहे. संभाव्य धोका लक्षात घेता अद्यावत आरोग्य यंत्रणा उभी करण्यासाठी तसेच रुग्णांना दर्जेदार व नाविन्यपूर्ण आरोग्य सेवा मिळण्याला घेऊन रुग्णालय साकारण्याची बाब आजच्या घडीला निकडीची ठरू पाहत आहे. त्यामुळे १०० खाटांच्या रुग्णालयासाठी सीएसआर फंडातून निधी उपलब्धी बाबत नियोजन करण्याची सूचना आमदार महोदयांनी केली. यावर जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी तत्काळ प्रस्ताव मागवला असून याबाबत संबंधित कार्यवाही गतीने पूर्ण करणार असल्याचे सांगितले. या ठिकाणी चांगल्या पद्धतीने हॉस्पिटल चालविण्यासाठी तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची सूचना सुद्धा आमदार महोदयांच्या वतीने करण्यात आली . अमरावती विभागासाठी आरोग्य संजीवनी ठरलेल्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ येथून तसेच मध्यप्रदेशाच्या सीमा भागातून रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यामुळे रुग्णासोबत असणाऱ्या नातेवाईकांना भोजनाला घेऊन गैरसोय व भटकंती सहन करावी लागते. शासनाने शिवभोजना योजना सुरु करून गरीब व गरजू घटकांना दिलासा दिला आहे. त्यामुळे सदर रुग्णालयाच्या परिसरात सुद्धा शिव भोजन योजना कार्यान्वित करण्यात यावी, अशी सूचना आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी केली. तसेच नावीन्यपूर्ण आरोग्य सुविधांची कामे, उर्वरित स्थापत्य व यांत्रिकी संदर्भातील कामे पूर्ण करण्याला घेऊन आपण लवकरच रुग्णालयाची पाहणी करणार असून या संदर्भातील अडचणी दूर करण्याला आपले प्राधान्य राहणार असल्याचा मनोदय आमदार महोदयांनी यावेळी व्यक्त केला . बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. पी . थोटांगे , उपविभागीय अभियंता तुषार काळे , उपअभियंता विद्युत संतोष वाडीभस्मे, शासकीय रुग्णालयीन व्यवस्थापक डॉ. सुरज धारपवार , महाराष्ट जीवन प्राधिकरणाचे सहायक अभियंता अतुल काटे, आयएमए शाखा अमरावतीचे अध्यक्ष डॉ. दिनेश ठाकरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. खोब्रागडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्याम गावंडे, सांख्यिकी पर्यवेक्षक राजू डांगे, सांख्यिकी पर्यवेक्षक श्याम सेवाणे, रोखपाल 2 विजय गाडे, आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *