४६ कोटीच्या वीजबिल वसूलीसाठी कर्मचारी थकबाकीदारांच्या दारी

अमरावती, दि.२७ एप्रिल २०२२; वाढत्या विजेची मागणी पुर्ण करण्यासाठी व भारनियमन टाळण्यासाठी महावितरणकडून खुल्या बाजारातून जादा दराने वीज घेत असल्याची स्थिती असतांना जिल्ह्यातील विविध वर्गवारीतील वीज ग्राहकांकडे ४६.५२ कोटीचे विजेचे बिल थकले आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या वीजबिल वसूली मोहीमेत थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. त्यामुळे कुलरची थंड हवा पाहीजे असेल, तर विजबिल भरा असे आवाहन महावितरणने केले आहे.

देशातील अनेक राज्यात भारनियमन सदृष्य परिस्थिती असतांना राज्यात मात्र मागील सात दिवसापासून कुठेच भारनियमन करण्यात आले नाही. विजेच्या मागणी पुरवठ्याचा समतोल साधण्यासाठी महावितरणकडून खुल्या बाजारातूनही वीज खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळे वीजबिलाची वसूली ही प्राधान्याने होणे गरजेचे आहे. परिणामी जिल्ह्याच्या ४२°च्या वर असलेल्या तापत्या उन्हात वीजबिल वसूलीसाठी महावितरणचे कर्मचारी हरघर दस्तक देत आहे.

जिल्ह्यात कृषी ग्राहक सोडून इतर विविध वर्गवारीतील १ लाख ९२  हजार ग्राहकांकडे ४६.५२ कोटीचे वीजबिल थकले आहे. यामध्ये घरगुती वर्गवारीतील १ लाख ७६ हजार ग्राहक असून त्यांच्याकडे ३१ कोटी २३ लाख रूपये थकीत आहे.वाणिज्यिक वर्गवारीतील १० हजार ८८३ ग्राहकांकडे ४ कोटी ४७ लाख रूपये थकीत आहे, तर औद्योगिक वर्गवारीतील २३०० ग्राहकाकडे ७ कोटी ८२ लाख थकीत आहे. याव्यतीरिक्त जिल्ह्यात सार्वजनिक सेवेसह इतर वर्गवारीतील ग्राहकाकडे ३ कोटी रूपयाचे वीज बिल थकले आहे.

मुख्य अभियंतासह वरीष्ट अधिकारीही वसूलीसाठी फिल्डवर :–  सध्याच्या भारनियमन सदृष्य परिस्थितीत अतीरिक्त विजेच्या नियोजनासाठी विजबिलाच्या वसूलीशिवाय पर्याय नसल्याने थकीत वीजबिल वसूलीसाठी परिमंडळाच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण,अधिक्षक अभियंता दिलीप खानंदे,सर्व विभागीय कार्यकारी अभियंते ४२°ते ४५° च्या तापत्या उन्हातही थकीत वीजबिल वसूली मोहीमेत प्रत्यक्ष सामिल झाले आहे.आजची थकीत बिल वसूली हे उद्याच्या विजेचे नियोजन असल्याने, कुलरची थंड हवा हवी असेल तर विजेचे बिल हे भरावे लागेल असे आवाहन महावतरणने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *