आमदार सौ.सुलभाताई खोडके यांनी घेतली मागील वर्षात अर्थसंकल्‍पात करण्‍यात आलेली तरतुद व झालेला खर्च बाबत बैठक

मा.आमदार सौ.सुलभाताई खोडके अमरावती मतदार संघ यांनी गुरुवार दिनांक २८ एप्रिल,२०२२ रोजी मागील वर्षात अर्थसंकल्‍पात करण्‍यात आलेली तरतुद व झालेला खर्च बाबत बैठक स्‍व.सुदामकाका देशमुख सभागृह येथे दुपारी १२.३० वाजता आयोजित करण्‍यात आली होती. या बैठकीत मनपा आयुक्‍त डॉ.प्रवीण आष्‍टीकर, राष्‍ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे महासचिव संजय खोडके, उपायुक्‍त सुरेश पाटील, उपायुक्‍त डॉ.सिमा नैताम, माजी महापौर-ऍड.किशोर शेळके, माजी नगरसेवक-अविनाश मार्डीकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष-प्रशांत डवरे, माजी नगरसेवक-प्रवीण मेश्राम, विजय बाभुलकर, भूषण बनसोड, गुड्डू धर्माळे, निलेश शर्मा, यश खोडके,प्रमोद महल्ले,योगेश सवई, प्रशांत पेठे, बंडू निंभोरकर, जितेंद्रसिंह ठाकूर,शक्ती तिडके,प्रा. डॉ. अजय बोंडे,बंडू धोटे, अमोल वानखडे, आनंद मिश्रा, किशोर भुयार, संजय मळनकर,कर्नलसिंग राहल,किशोर देशमुख, अनिल शुक्ला, संजय बोबडे, सुयोग तायडे, सचिन दळवी, शुभम पारोदे, मुख्तार अहेमद,संदीप आवारे,हबीब खान ठेकेदार,नदीम मुल्ला सर, अबरार साबीर, आदीसह मनपा अधिकारी, कार्यकर्ते व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

महानगरपालिकेचे एकुण महसुली उत्‍पन्‍न २६४.९९ कोटी झाले असून एकुण महसुली खर्च २६४.९९ इतका झाला आहे. सर्वप्रथम बांधकाम विभागात लेखाशिर्षानुसार तरतुद किती देण्‍यात आली व खर्च किती झाला यावर चर्चा करण्‍यात आली. समाविष्‍ट ग्रामीण या शिर्षाचे नाव बदलविण्‍याचे यावेळी त्‍यांनी सुचित केले. अ खर्चीत निधीबाबत यावेळी त्‍यांनी नाराजी व्‍यक्‍त केली. स्‍मशानभुमीसाठी दिलेल्‍या तरतुदीनुसार कार्य होणे अपेक्षित आहे. अनेक स्‍मशानभुमी या अविकसित असून त्‍यांचा कायापालट करणे गरजेचे आहे. रहाटगावं येथील स्‍मशानभुमीला निधी उपलब्‍ध करुन देण्‍यात आला असून इतरही स्‍मशानभुमीसाठी निधीची उपलब्‍धता करुन देण्‍यात येईल. याबाबींसाठी प्रस्‍ताव सादर करावे. तसेच महानगरपालिकेकडुन स्‍मशानभुमी या शिर्षावर जो निधी दिला आहे तो संपुर्ण खर्च करुन शहरातील सर्वच स्‍मशानभुमी विकसित कराव्‍या अश्‍या सुचना यावेळी आमदार महोदयांनी दिल्‍या.

शहरातील स्‍वच्‍छतेवर मोठा खर्च होत असून स्‍वच्‍छ अमरावती सुंदर अमरावती ही संकल्‍पना राबविलीच गेली पाहिजे अश्‍या स्‍पष्‍ट सुचना यावेळी देण्‍यात आल्‍या.

महानगरपालिकेचे दवाखाने हे आधुनिक असले पाहिजे. सद्याच्‍या स्थितीत महानगरपालिकेचे दवाखाने अतिशय खराब स्थितीत असून दवाखान्‍याचे नुतनीकरण करणे अपेक्षित आहे. दिलेल्‍या निधीत आपण ते कार्य करायला हवे होते. शहरातील प्रत्‍येक दवाखान्‍यात औषधीचा साठा पुर्ण असणे अपेक्षित आहे. तशी कार्यवाही त्‍वरीत करण्‍यात यावी. महानगरपालिकेचे सर्वात महत्‍वाचे दायित्‍व म्‍हणजे नागरिकांचे आरोग्‍य होय. याकडे आरोग्‍य विभागाने जातीने लक्ष देणे अपेक्षित आहे. शासनाकडुन आलेला निधी त्‍या त्‍या कामावर खर्च होणे अपेक्षित असून तो खर्च न झाल्‍यास संबंधीतांना उत्‍तर द्यावे लागेल.

शहरातील अनेक उद्याने हे खराब होत चाललेली आहे. त्‍यावर योग्‍य नियोजन करुन ते सुव्‍यवस्थित करणे गरजेचे आहे. उद्यान विभागाला मोठी तरतुद दिली असल्‍याने त्‍या विभागाने उद्यानाचा ख-या अर्थाने विकास केला पाहिजे. कंत्राटदारांकडुन काम करुन घेणे हे फार महत्‍वाचे असून उद्यान विभाग याबाबतीत कमी पडत असल्‍याचे निदर्शनात आले आहे.

पशुशल्‍य विभागाने शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्‍त लावणे गरजेचे आहे. अनेक भागात मोकाट जनावरांचा मोठा उपद्रव दिसून येत असून त्‍याला पायबंद घालणे महत्‍वाचे आहे. महानगरपालिकेच्‍या कोंडवाडासाठी जागा निश्चित करुन त्‍याठिकाणी कोंडवाडा निर्मिती करावी.

आमदार सुलभाताई खोडके यांनी या बैठकीत सांगीतले की, शाळा हा सर्वात महत्‍वाचा विषय आहे. महानगरपालिकेच्‍या शाळेत गरीब विद्यार्थी शिकत असून त्‍या विद्यार्थ्‍यांना गुणवत्‍ता पूर्वक व दर्जेदार शिक्षण देणे अपेक्षित आहे. शाळेचा दर्जा सुधारण्‍यासाठी महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणात तरतुद करणे अपेक्षित आहे. दिलेल्‍या तरतुदीमध्‍ये शाळेचा कायापालट करुन विद्यार्थ्‍यांना इतर शाळेप्रमाणे सुविधा उपलब्‍ध करुन द्याव्‍या. हा विषय अग्रगन्‍य असून येणा-या दिवसात या विषयाला घेवून बैठक घेवून शाळेचा दर्जा उंचावण्‍यासाठी सामुहीक प्रयत्‍न केल्‍या जाईल. या विषयात कोणी हलगर्जीपणा करत असल्‍यास त्‍यावर तात्‍काळ कार्यवाही करण्‍यासाठी प्रस्‍तावित केल्‍या जाईल.

मागास वर्गीय कल्‍याणासाठी येणारा निधी त्‍याच कामावर खर्च होणे अपेक्षित आहे. दिव्‍यांग नागरिकांना महानगरपालिकेने सहकार्य करणे अपेक्षित आहे. त्‍यांना जेवढे सहकार्य करता येईल तेवढे सहकार्य करावे. समाज कल्‍याण विभागाकडुन शहरात खोके वाटप करण्‍यात आले असून त्‍या संदर्भातील माहिती काढून जे रहदारीसाठी अडथडा निर्माण करत असेल त्‍याचे नियोजन बरोबर करण्‍याच्‍या सुचना या बैठकीत देण्‍यात आल्‍या. महिला व बालकल्‍याण विभागाकडुन खेळणी हा शिर्ष काढून टाकण्‍याच्‍या सुचना यावेळी त्‍यांनी दिल्‍या. शहरातील पथदिवे सुरळीत सुरु राहतील याची दक्षता घ्‍यावी. पर्यावरण विभागामार्फत माझी वसुंधरा या उपक्रमाअंतर्गत पथनाट्य सादर करण्‍यात आले होते त्‍याची माहिती यावेळी आमदार महोदयांनी मांगीतली. शहरातील वृक्षलागवड मोठ्या प्रमाणात होणे अपेक्षित असून ते कार्य पर्यावरण विभागाने प्राधान्‍याने घेणे गरजेचे आहे.

या बैठकीत आमदार महोदयांनी सन २०२१-२२ मध्‍ये करण्‍यात आलेल्‍या तरतुदीनुसार विभागावार आढावा घेतला. महानगरपालिकेने आपल्‍या दायित्‍वाप्रती कार्य करणे गरजेचे आहे. अमरावती विधानसभा कार्यक्षेत्रात येणा-या प्रत्‍येक कामाची माहिती ही महानगरपालिकेने देणे अपेक्षित आहे. नागरिकांना सोईसुविधा या उपलब्‍ध करुन दिल्‍याच पाहिजे असे यावेळी त्‍यांनी प्रतिपादन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *