नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव; मुख्यमंत्र्याचे भूमिपुत्रांना आश्वासन

नवी मुबंई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भूमिपुत्रांना दिलं आहे.

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नवी मुंबई येथील भूमिपुत्रांनी भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकी दरम्यान मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिलं असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, याबाबत जी आर काढण्याचा संबंधच नसल्याचंही सांगितलं आहे.

तसंच बाळासाहेब ठाकरे यांच नाव मला आवडतं, पण नवी मुबंई विमानतळाला दि.बां च्या कार्यामुळे आणि भूमिपुत्रांच्या आग्रहास्तव नाव देणार असल्यातं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. त्यामुळे अनेक दिवसांपासून वादग्रस्त ठरलेल्या नवी मुंबई विमानतळाच्या नावाचा मुद्दा आता निकाली निघणार का? याकडे सर्व भूमिपुत्रांचे लक्ष लागून राहिलं आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ तयार होण्याआधीच राजकारणाच्या तावडीत सापडलं आहे. या विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा ठराव सिडकोत मंजूर झाला होता. राज्य सरकारनेदेखील या नावाला हिरवा कंदील दाखवला आहे.

मात्र, इथल्या प्रकल्पग्रस्तांच्या त्यागातून हे विमानतळ उभं राहत असल्याने प्रकल्पग्रस्तांचे थोर नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी, नवी मुंबईतील भुमिपुत्र, प्रकल्पग्रस्त संघटना, भाजप आणि मनसेपाठोपाठ आता काँग्रेसनेही केली होती. त्यामुळे या विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव नको तर दि.बा पाटलांचे नाव द्या या मागणीने चांगलाचं जोर धरला होता. शिवाय राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडी पाहता ठाकरेंना आता भूमिपुत्रांचा रोष ओढावून घ्यायचा नसल्याने त्यांनी हे आश्वासन दिल्याचं बोललं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *