अकरावीच्या मुलाने छापल्या पाचशेच्या बनावट नोटा चलनातही आणल्या; चॉकलेट घ्यायला गेला अन् पोलिसांजवळ पोहोचला

परतवाड्यातील अकरावीत शिकणाऱ्या एका साडेसोळा वर्षीय मुलाने त्याच्या वडीलांच्या शिकवणी वर्गाच्या ऑफीसमधील संगणक, प्रिंटरचा वापर करुन पाचशेच्या बनावट नोटा तयार केल्या आहे. विशेष म्हणजे या नकली नोटा त्याने चलनातसुद्धा आणल्या. मात्र, शुक्रवारी (दि. २९) परतवाडा पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत त्या मुलाची विचारपूस करुन तीन नकली नोटांसह संगणक, प्रिंटर व अन्य साहित्य जप्त केले आहे.
परतवाडा शहरातील गंगाभवन भागातील एका किराणा दुकानात पोलिसांनी या मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मुलाने ५०० रुपयांची नोट देत ४५ रुपयांचे चॉकलेट खरेदी केले. दुकानदाराला मुलाने दिलेल्या पाचशेच्या नोटेबाबत संशय आल्याने त्यांनी त्याला विचारणा केली असता, त्याने ही नोट एटीएममधून काढल्याची माहिती दिली. दुकानदाराने या अल्पवयीनाला आधार कार्ड मागीतले असता त्याने काढून दिले. त्यावर त्याचे नाव व पत्ता नमूद होता. मात्र आधार कार्ड काढताना त्याच्या खिशातून एकाच नंबरच्या आणखी दोन पाचशे रुपयांच्या नोटा मिळून आल्या. बिंग फुटत असल्याने मुलाने पळ काढला. याबाबत किराणा दुकानदाराने पोलिसांना माहिती देत ५०० रुपयांच्या तीनही नोटा पोलिसांना दिल्या.
पोलिसांना घटनेची गंभीर दखल घेत मुलाच्या आधार कार्डावर असलेल्या पत्त्याच्या अनुषंगाने शोध घेतला. दरम्यान, या मुलाचे वडील शिकवणी वर्ग घेत असून पोलिसांनी शिकवणी वर्गांची झडती घेतली असता तेथे बनावट नोटा छापण्याचे साहित्य आढळून आले.
असे आले लक्षात
बनावट नोटेवर खऱ्या नोटांप्रमाणे अक्षर, चित्र स्कॅन व्हायचे मात्र खऱ्या नोटेवर असलेले महात्मा गांधी यांचे छायाचित्र बनावट नोटेवर नव्हते. कारण नोटेवरील गांधी यांचा फोटो स्कॅन होत नाही. ही बाब त्या मुलाला लक्षात आली नाही व दुकानदाराला दिलेल्या नोटेवर फोटो न दिसल्यामुळे मुलाचे बिंग फुटले.
बनावट नोटा छापण्यासाठी वापरलेले साहित्य, नोटा जप्त
पोलिसांनी बनावट नोटा छापण्यासाठी वापरलेले संगणक, सीपीयू, कलर प्रिंटर, स्कॅनर, लेझर प्रिंटर, ५०० रुपयांच्या बनावट तीन तर एका बाजुने प्रिंट केलेल्या २४ नोटा, बाँड पेपर, सुपरव्हाइट बाँड पेपर, कागद कापण्यासाठी एक कटर, स्टीलची स्केल, एक गोल्डन शाईचा पेन व इतर साहित्य मिळून आले. पोलिसांनी कारवाईदरम्यान ३३ हजार १७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *