शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव देशमुख यांचा १२४ वा जयंती उत्सव उत्साहात साजरा, संस्थेची दैनंदिनी व शिवसंस्था त्रैमासिकाच्या जयंती विशेषांकाचे प्रकाशन

  • शेतकरी अन्नदाता बरोबरच उर्जादाता झाला पाहिजे – ना.नितीन गडकरी
  • सामाजिक परिवर्तन हेच भाऊंचे उद्धिष्ट होते – पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात
  • भाऊसाहेब हा एक विचार होता – कुलगुरू डॉ. प्रमोद येवले

अमरावती – ज्ञान ही यशाची पहिली पायरी आहे हे डॉ.पंजाबराव देशमुख यांनी सांगितले पण आजच्या बदलत्या काळात या ज्ञानाचा उपयोग कसा करावा हे महत्त्वाचे आहे.ग्रामीणक्षेत्रात सामाजिक व आर्थिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपण काय करू शकतो हे लक्षात घेऊन व काळाच्या ओघातले परिवर्तन ओळखून डॉ.पंजाबराव देशमुखांचे स्वप्न साकारण्याकरिता प्रयत्न केले पाहिजे. शेतकरी अन्नदाता बरोबरच उर्जादाता झाला पाहिजे. ज्या दिवशी आपण विदर्भातील शेतकऱ्याला आत्महत्या मुक्त करू, तीच भाऊसाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना.नितीन गडकरी यांनी केले.

श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचा १२४ वा जयंती उत्सव आणि दैनंदिनी व शिवसंस्था त्रैमासिकाच्या प्रकाशनानिमित्त आयोजित सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष श्री. हर्षवर्धन देशमुख यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या सोहळ्याला विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मश्री डॉ.सुखदेव थोरात आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.संस्थेचे उपाध्यक्ष सर्वश्री. अॅड.गजाननराव पुंडकर, अॅड.जयवंत उर्फ भैयासाहेब पाटील पुसदेकर, केशवराव मेतकर, कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले, कार्यकारिणी सदस्य सर्वश्री. हेमंत काळमेघ, प्राचार्य केशवराव गावंडे, सुरेशदादा खोटरे, प्रा.सुभाष बनसोड, सचिव वि.गो.ठाकरे, स्वीकृत सदस्य डॉ.महेंद्र ढोरे, नरेशचंद्र पाटील, डॉ.पी.एस.वायाळ व डॉ.अमोल महल्ले यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

या कार्यक्रमात आभासी पद्धतीने सहभागी झालेले ना.नितीन गडकरी म्हणाले की, आजच्या काळामध्ये भाऊसाहेबांच्या विचारांचे केवळ चिंतन करून चालणार नाही तर प्रत्यक्ष कृती करणे आवश्यक आहे. भाऊसाहेबांचे व्यक्तिमत्त्व चौफेर होते कृषिमंत्री म्हणून त्यांचे कार्य मोठेच होते पण ‘सेवाभाव धरा’ ही शिकवण देणाऱ्या भाऊंचे समाज सुधारणेच्या कार्यात फार मोठे योगदान होते. पंजाबरावांच्या स्वप्नातील ग्रामीण भागाच्या उन्नतीसाठी काय करता येईल यासाठी एक आराखडा तयार करावा. स्मार्ट शहरे होतात तर मग स्मार्ट खेडे का होऊ शकत नाही ? असा सवालही त्यांनी केला. डॉ.पंजाबराव देशमुख यांचा वारसा संस्थेमार्फत यशस्वीपणे चालविला जात असल्याबद्धल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

पद्मश्री डॉ.सुखदेव थोरात
डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठेपणाची व्याख्या करताना जे मापदंड वापरले आहेत ते भाऊसाहेबांना तंतोतंत लागू होतात. ज्ञान आणि प्रामाणिकपणाने जी व्यक्ती योग्य सामाजिक परिवर्तन घडवून आणते, तीच व्यक्ती मोठी असते. समाजातील गरिबी, जातीव्यवस्था आणि दु:ख दूर करण्यासाठी पंजाबराव देशमुख यांनी आपले आयुष्य खर्ची घातले. सामाजिक परिवर्तन हेच त्यांचे उद्धिष्ट होते, या शब्दात विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मश्री डॉ.सुखदेव थोरात यांनी भाऊसाहेबांचे मोठेपण विशद केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या भाऊसाहेबांना केवळ शेती व शिक्षणापुरते मर्यादित न करता त्यांचे सामाजिक परिवर्तनाचे कार्य लक्षात घ्या व त्या दृष्टीने कार्य करा, असेही थोरात म्हणाले.

कुलगुरू डॉ. प्रमोद येवले
काही लोक द्रष्टे असतात. भाऊसाहेब असेच द्रष्टे होते.त्यांना पुढेचे दिसत होते म्हणून त्यांनी सर्वांना कुणबी हे लेबल लावले आणि घटनेने आरक्षण मिळवून दिले त्यामुळे त्यांचे ऋण आपण कधीही फेडू शकणार नाही.भाऊसाहेब हा एक विचार होता,या शब्दात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या देशाला ज्या शिक्षणाची आवश्यकता आहे, ते शिक्षण दुर्देवाने मिळाले नाही.या देशाला कशाची आवश्यकता आहे याचा विचार आपण केला पाहिजे.आपल्याला संस्थेतून नोकऱ्या देणारे विद्यार्थी निर्माण करायचे असून एक राज्यस्तरीय विद्यापीठ म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्थेने पुढे येणे ही काळाची गरज आहे, असे ही येवले म्हणाले.

हर्षवर्धन देशमुख
‘शिका,संघटीत व्हा आणि लढा’ हा डॉ.आंबेडकरांचा विचाराच्या समाज सुधारकाच्या संस्थेमध्ये आपण आहोत ही अभिमानाची बाब असून समाजाशी बांधिलकी आणि गरीब व दुर्बल घटकांचे उत्थान हा भाऊसाहेब यांच्या मंत्र घेऊन आम्ही काम करतो आहोत, असे सांगून कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री हर्षवर्धन देशमुख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून संस्थेचे कार्य स्पष्ट केले. पुढच्या वर्षी भाऊसाहेबांची १२५ वी जयंती असून ती स्मरणीय राहण्यासाठी वर्षभर उप्रक्रम व कार्यक्रम राबविण्यात येईल. भाऊसाहेबांचे विचार सर्व समाजापर्यंत पोहोचाविण्यासाठी संस्थेतील सर्व घटकांनी प्रयत्न करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

प्रारंभी मान्यवरांनी भाऊसाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून आदरांजली अर्पण केली. कार्यक्रमात पाहुण्यांचा शाल, पुष्पगुच्छ, ग्रंथ व स्मृतीचिन्ह देऊन अध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी संस्थेच्या ‘दैनंदिनी २०२३’ व ‘शिवसंस्था’ त्रैमासिकाच्या डॉ.पंजाबराव देशमुख जयंती विशेषांकाचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते झाले. कोषाध्यक्ष श्री.दिलीपबाबू इंगोले यांनी आपल्या प्रास्ताविकातून संस्थेच्या विकासात्मक कामाचा व नियोजित कामाचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे संचालन प्रा.डॉ.मनीष गायकवाड यांनी केले तर संस्थेचे सचिव डॉ.वि.गो.ठाकरे यांनी आभार मानले. बाबासाहेब सांगळूदकर महाविद्यालय, दर्यापूरच्या संगीत विभागाच्या चमूने डॉ.राजेश उमाळे यांच्या नेतृत्त्वात स्वागत गीत व गौरवगीत सादर केले. कार्यक्रमाला संस्थेचे आजीव सदस्य, गणमान्य नागरिक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *