DHULE | धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचे एकहाती वर्चस्व

धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील निवडणूक ही भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी अशी रंगली होती. या निवडणुकीत प्रामुख्याने लढत खासदार डॉ. सुभाष भामरे विरुद्ध आमदार कुणाल पाटील यांच्यात झाली. यामध्ये खासदार सुभाष भामरे यांना धक्का देत आमदार कुणाल पाटील यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपले निर्विवाद पुन्हा सिद्ध केले आहे. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत तब्बल 18 पैकी 16 जागांवर वर्चस्व मिळवत निर्विवाद आपले बहुमत सिद्ध केले आहे. महाविकास आघाडीला मिळालेल्या या अभूतपूर्व यशानंतर धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांनी बाजार समिती आवारात जल्लोष साजरा केला. यावेळी गुलालाची मुक्त उधळण करत यावेळी कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंद उत्सव साजरा केला.

धुळे शहरासह जिल्यासाठी प्रतिष्ठेची ठरलेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा आज निकाल जाहीर करण्यात आला. या निकालात 18 पैकी तब्बल 16 जागांवर काँग्रेसने विजय मिळवत निर्विवाद बहुमत सिद्ध केले आहे. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणुकीसाठी खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी भाजपा पॅनलच्या माध्यमातून आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. तसेच गेल्या अनेक वर्षांची सत्ता कायम ठेवण्यासाठी आमदार कुणाल पाटील यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपली प्रतिष्ठा पणाला लावत खासदार सुभाष भामरे यांच्या पॅनलला ‘काटे की टक्कर’ देत धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीने झेंडा फडकवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *