महानगरपालिकेच्‍या आरोग्‍य विभाग व स्‍वच्‍छता विभागाची टोपेनगर, मांगीलाल प्‍लॉट, व राजमाता नगर येथे संयुक्‍त पाहणी

  • संपुर्ण परिसरात पाण्‍याचे साठे तपासण्‍यात आले
  • परिसरात धुवारणी व फवारणी करण्‍यात आली

अमरावती प्रतिनिधी,

महानगरपालिका शहरी आरोग्‍य केंद्र क्र.१ जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालय अंतर्गत टोपेनगर, मांगीलाल प्‍लॉट तसेच राजमाता नगर भागात डेंग्‍यू प्रतिबंधात्‍मक उपाययोजना करण्‍यात आली. आरोग्‍य विभाग व स्‍वच्‍छता विभागाने या परिसरात संयुक्‍त पाहणी केली. या परिसरात डेंग्‍यूचे रुग्‍ण आढळत असल्‍याने सदर परिसरात टेमिफास्‍ट अॅक्‍टीवीटी, धुवारणी व फवारणी करण्‍यात आली तसेच आशावर्कर मार्फत पाण्‍याचे साठे तपासण्‍यात येवून दुषित आढळलेले कंटेनर रिकामे करण्‍यात आले. घरोघरी जाऊन हस्‍तपत्रके वाटप करण्‍यात आले. नागरिकांमध्‍ये मोठ्या प्रमाणात डेंग्‍यू या आजाराविषयी जनजागृती करण्‍यात आली. सदर भागामध्‍ये डेंग्‍यू आजार झालेल्‍या रुग्‍णांना भेट देवून प्रकृतीची पाहणी करण्‍यात आली.

किटकजन्‍य आजाराबाबतची सद्यःस्थिती व साथरोग नियंत्रणासाठी आवश्‍यक त्‍या उपाययोजना महानगरपालिकास्‍तरावरुन राबविण्‍यात येणा-या उपाययोजना याबाबत साथरोग नियंत्रणासाठी आवश्‍यक त्‍या प्रतिबंधात्‍मक उपाययोजना राबविण्‍यासाठी मार्गदर्शक सुचना स्‍त्री वैद्यकीय अधिकारी डॉ.पुर्णिमा उघडे यांच्‍या मार्फत देण्‍यात आले. डेंग्‍यु ताप हा विशिष्‍ट विषाणुमुळे होतो. डेंग्‍युचा प्रसार हा एडीस एजिप्‍टाय नावाच्‍या डासांमार्फत होतो. सदर डासांची उत्‍पत्‍ती साठवलेल्‍या स्‍वच्‍छ पाण्‍यात होते. त्‍यामध्‍ये उघडे रांजण, सिमेंटच्‍या टाक्‍या, इमारतीवरील पाण्‍याच्‍या टाक्‍या इत्‍यादी तसेच घराभोवतालच्‍या टाकाऊ वस्‍तु उदा. प्‍लास्टिकच्‍या बादल्‍या, रिकाम्‍या बाटल्‍या, नारळाच्‍या करवंट्या, निरुपयोगी टायर्स इत्‍यादीमध्‍ये साठवलेले पाणी, घरातील शोभेच्‍या कुंड्या, फुलदाण्‍या, कुलर्स इत्‍यादीमध्‍ये साठलेले पाणी यामध्‍ये होते. उघड्या व स्‍वच्‍छ पाण्‍यात मादी डास अंडी घालुन ७ ते ८ दिवसात पुर्ण वाढ झालेल्‍या डासांमध्‍ये रुपांतर होते. त्‍या अनुषंगाने कोणतेही साठलेले पाणी ८ दिवसांपेक्षा जास्‍त साठवून ठेवू नये ही खबरदारी घेणे अत्‍यंत आवश्‍यक आहे.

डासाची उत्‍पत्‍ती कमी करणे / नियंत्रणात ठेवणे यासाठी लोकांना आरोग्‍य शिक्षण देवुन जनजागृती करण्‍यात येत आहे. लोकसहभागाशिवाय या आजाराचे नियंत्रण शक्‍य नाही. डेंग्‍युताप हा फलॅव्‍हीव्‍हायरस प्रकारच्‍या विषाणुमुळे होत असून त्‍याचे डेंग्‍यु-१ ते डेंग्‍यु-४ असे चार प्रकार आहेत. तसेच एडीस एजिप्‍टाय डासांची माहिती देण्‍यात आली. या डासाची उत्‍पत्‍ती घरातील व परिसरातील साठलेले / साठविलेले स्‍वच्‍छ पाण्‍याचे साठे. (उदा. रांजण, हौद, पाण्‍याचे मोठे बॅरल, इमारतीवरील पाण्‍याच्‍या टाक्‍या, कुलर्स, कारंजी, फुलदाण्‍या इत्‍यादी), घराच्‍या परिसरातील टाकलेल्‍या निरुपयोगी वस्‍तुमध्‍ये साठलेले स्‍वच्‍छ पाणी (उदा. नारळाच्‍या करवंट्या, डबे, बाटल्‍या, प्‍लास्टिकची भांडी, रिकाम्‍या कुंड्या, टायर्स इत्‍यादी.), बांधकामाच्‍या ठिकाणी असलेले पाण्‍याचे उघडे साठे या ठिकाणी होते. डेंग्‍युतापाच्‍या रुग्‍णांस एडिस एजिप्‍टाय डासांची मादी चावल्‍यास तिच्‍या शरीरात डेंग्युतापाचे विषाणु प्रवेश करतात. साधारणपणे ८ ते १० दिवसांत डासांच्‍या शरीरात डेंग्‍यु विषाणुंची पुर्ण वाढ झाल्‍यावर हा दुषित डास कोणत्‍याही निरोगी व्‍यक्‍तीला चावल्‍यास त्‍या व्‍यक्‍तीस डेंग्‍युताप होऊ शकतो. एकदा दुषित झालेला डास तो मरेपर्यंत दुषित राहतो. डेंग्‍युताप रुग्‍णांमध्‍ये तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, स्‍थायु दुखी व सांधेदुखी, उलट्या होणे, डोळ्यांच्‍या आतील बाजुस दुखणे, टंगावर पुरळ, अशक्‍तपणा, भुक मंदावणे, तोंडाला कोरड पडणे, रक्‍तातील प्‍लेटलेटची संख्‍या कमी होणे या प्रकारचे लक्षणे आढळून येतात. डेंग्‍युतापावर निश्चित असा औषधोपचार नाहीत. वेदनाशामक औषधी व विश्रांती घेणे आवश्‍यक असते. या रुग्‍णांना अॅस्‍पीरिन, ब्रुफेन इत्‍यादी सारखी औषधे देवू नयेत. डेंग्‍युतापाच्‍या रुग्‍णांना वयोमानानुसार पॅरासिटेमॉल गोळ्यांचा उपचार करावा व वैद्यकीय आरोग्‍य अधिका-याचा सल्‍ला त्‍वरीत घ्‍यावा.

डेंग्‍युतापाच्‍या प्रतिबंधक / नियंत्रणासाठी उपाययोजना यावेळी सांगण्‍यात आल्‍या की, उद्रेकाच्‍या ठिकाणी दैनंदिन सर्वेक्षण, दैनंदिन सर्वेक्षणांतर्गत ताप रुग्‍णांचे रक्‍तनमुने तपासून हिवताप नसल्‍याची खात्री करणे, ताप रुग्‍णांना उपचार, निवडक ताप रुग्‍णांचे रक्‍तजल नमुने गोळा करुन जवळील सेंटीनल सेंटरला विषाणु परिषणासाठी पाठविणे, आरोग्‍य कर्मचा-यांमार्फत नियमित किटक शास्‍त्रीय सर्वेक्षण, घरातील व घराच्‍या परिसरातील पाणी साठ्यातील डास अळी घनतेची पाहणी, डास अळ्या आढळून आलेली भांडी रिकामी करणे, जी भांडी रिकामी करता येत नाहीत अशा ठिकाणी टेमिफॉस (अबेट) या अळीनाशकाचा वापर करणे, जीवशास्‍त्रीय उपाययोजनेंतर्गत डासोत्‍पत्‍ती डासअळी भक्षक गप्‍पीमध्‍ये सोडणे, उद्रेकग्रस्‍त ठिकाणी घरोघर किटकनाशकाची धुरफवारणी करावी.

या पाहणी वेळी नागरिकास आरोग्‍य शिक्षण देण्‍यात आले की, त्‍यांनी आठवड्यातून किमान एकदा कोरडा दिवस पाळावा, घरातील पाणी साठ्याची भांडी आठवड्यातून किमान एकदा रिकामी करुन घासून पुसुन कोरडी करुन पुन्‍हा वापराव्‍या, घराच्‍या परिसरातील किंवा घराच्‍या छतावरील टाकाऊ / निरुपयोगी वस्‍तु नष्‍ट कराव्‍या, डासांपासुन व्‍यक्‍तीगत सुरक्षिततेसाठी मच्‍छरदाणीचा वापर, डास प्रतिरोध क्रिमचा वापर, शरीर पूर्ण झाकेल असे कपडे घालणे, घर व घराचा परिसर स्‍वच्‍छ ठेवावा.

डांसापासून रक्षण करण्‍यासाठी मच्‍छरदाणी, मॉस्‍क्‍युटो रिपेलंट उदा.कॉईल, मॅट, मलम इत्‍यादीचा उपयोग करावा. झोपतांना शरीर कापडाने संपूर्ण झाकलेले राहील याची दक्षता घ्‍यावी तसेच लहान मुलांची डासांपासून रक्षण होण्‍याचे दृष्‍टीने त्‍यांना पांघरुणातच ठेवावे. प्राचार्य, मुख्‍याध्‍यापक, अधिक्षक, व्‍यवस्‍थापक, होटल मालक यांनी आपले महाविद्यालय, शाळा, वसतीगृह, मंगल कार्यालय, हॉटेल इतर ठिकाणी पाणी साठवणूकचे संपूर्ण साधने नियमितपणे स्‍वच्‍छ धुवून पुसून भरावीत. आपले इमारतीचे माडीवर टाकावू वस्‍तुंमध्‍ये पाणी साठून राहणार नाही याबाबतची खबरदारी घ्‍यावी. डास साधारणत: सकाळी व सायंकाळी ५ ते ७ वा. दरम्‍यान बाहेर निघतात अशावेळी शक्‍यतो घराचे दरवाजे खिडक्‍या बंद ठेवाव्‍यात. हवा येणेकरीता खिडक्‍यांना जाळ्या लावाव्‍यात. महानगरपालिकेतर्फे घराघरातून कचरा गोळा करण्‍यासाठी घंटीकटले तसेच कंटेनर व कुंड्यांची व्‍यवसथा केली आहे. आपला कचरा त्‍यातच टाकावा.

डेंग्‍युताप नियंत्रणासाठी शासकीय प्रयत्‍नांबरोबरच जनतेचे सक्रिय सहकार्य अत्‍यंत आवश्‍यक आहे असे आवाहन आयुक्‍त देविदास पवार यांनी केले आहे.

सदर मोहीमेमध्‍ये महानगरपालिका झोन क्र.२ चे सहाय्यक आयुक्‍त भुषण पुसतकर, स्‍त्री वैद्यकीय अधिकारी डॉ.पुर्णिमा उघडे, जेष्‍ठ स्‍वास्‍थ निरीक्षक विजय बुरे, स्‍वास्‍थ निरीक्षक अजिंक्‍य जंवजाळ, आरोग्‍य सहाय्यक पुरुषोत्‍तम लुंगे, आरोग्‍य सेवक निलेश राजपूत, ओमकार क-हाळे, पीएचएन प्राची गुल्‍हाणे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रगती तट्टे, ब्रिडींग चेकर संदिप बोके, मोहम्‍मद कैफ, आरोग्‍य सेविका बाली खंडारे, प्रतिक्षा दुधे, शालीनी रामटेके, वैशाली निमकर, शुभांगी लायसे, ठेकेदार राजेश शर्मा, बिटप्‍यून लकी परोचे तसेच सर्व आशा स्‍वयंमसेविका उपस्थित होत्‍या. माजी नगरसेवक डॉ.प्रणय कुलकर्णी, चेतन चौधरी यांच्‍यासह अनेक नागरिकांनी महानगरपालिकेला या मोहीमेसाठी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *