फिनले मिल बंद पडल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ, गिरणी कामगारांनी चंद्रशेखर बावनकुळेंचा ताफा अडवला

अमरावती: जिल्ह्यातील केंद्र सरकारच्या अधिनस्त असणारा अचलपूर येथील फिनले मिल कोरोना पासून बंद पडल्याने १ हजार पेक्षा अधिक कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. बेरोजगार झाल्याने आतापर्यंत तेरा कुशल कामगारांनी आत्महत्या केली आहे. अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी फिनले मिल परिसरात गेले असता त्यांना कामगारांनी घेराव घालत मिल सुरू करण्यासाठी आग्रही मागणी धरली. केंद्र सरकारच्या अधिनस्त असणारे महाराष्ट्रातील अनेक मिल बंद पडत आहे. मग केंद्रात भारतीय जनता पार्टीचे सरकार असून जिल्ह्यातील नागरिकांना उपयोग काय? यावर प्रदेशातील बावनकुळे यांनी दिल्लीत मिटींगला असे उत्तर दिले. त्यावर संतप्त कामगारांनी साहेब मीटिंग खूप झाल्या, आता निर्णय घ्या अशी आक्रमक भूमिका घेतली.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती येथील फिनले मिलचे उत्पादन कोराना काळात कच्चा मालाअभावी मागील ४ वर्षापासुन बंद आहे. त्यामुळे या मिलमध्ये काम करणारे १००० कर्मचारी हे अर्ध्या पगारावर आहेत. परिणामी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आणि मिल उत्पादन बंद असल्यामुळे मिल कामगारांमध्ये भविष्याच्या काळजीमुळे एक प्रकारे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिलमध्ये कच्चा मालाअभावी उत्पादन बंद असल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. याचा परिणाम म्हणून गेल्या काही दिवसात या मिलमध्ये काम करणाऱ्या १३ कामगारांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांचे कुटूंब आर्थिक अडचणीमध्ये सापडले आहे, हे कामगारांकरीता अतिशय चिंताजनक गोष्ट आहे.

उत्पादनदृष्टया नफ्यात असलेली मिल कच्चा मालाच्या पुरवठ्याअभावी बंद पडली, तर अचलपूर तालुक्यातील अर्थव्यवस्था कोलमडल्याशिवाय राहणार नाही. आधीच कोरोनामुळे उत्पादन बंद असल्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. फिनले मिल मेळघाटच्या पायथ्याशी असल्यामुळे आदिवासींसह स्थानिक लोकांना रोजगाराचे एकमेव साधन आहे. विशेष म्हणजे या मिलमध्ये काम करणारे कामगार हे २५ ते ३५ या वयोगटातील असल्यामुळे मिल जर बंद पडली तर जवळ जवळ १००० कुटूंब आर्थिक दृष्ट्या आणि कौटुंबिक स्थरावर उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. या संदर्भात आम्ही माननीय वस्त्रोद्योग मंत्री ना. श्री. पियुपजी गोयल यांचेशी चर्चा सुध्दा केली आहे. ते या संदर्भात सकारात्मक आहेत. तसेच नितीन गडकरी यांनी सुध्दा मिल बंद होऊ नये म्हणून तसे पत्र सुध्दा दिले आहे. परंतु अद्याप पर्यंत फिनले मिलचे कच्चा माला अभावी उत्पादन सुरू न झाल्यामुळे या सर्व कामगारांच्या मनामध्ये भितीचे आणि निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

या फिनले मिलला खुप जुनी परंपरा आहे. याआधी याच ठिकाणी विदर्भ मिल होती. पुढे काही वर्षांनंतर या मिलचे फिनले मिलमध्ये रूपांतर झाले. अमरावती जिल्ह्यातीलच नव्हे तर विदर्भातील सर्वांत मोठी मिल म्हणुन या मिलचे नावलौकीक आहे. या भागातील रोजगाराचे एकमेव साधन आहे. हि मिल जर भविष्यात बंद पडली तर येथील तरूण गुन्हेगारीकडे सुध्दा जाऊ शकतात. त्यामुळे आपल्याला आमच्या कामगारांच्या वतीने मनापासुन विनंती आहे की, आपण आम्हा गिरणी कामगारांना न्याय द्यावा. या फिनले मिलला कच्चा माल उपलब्ध करून देऊन या मिलचे उत्पादन पुन्हा सुरू करून आम्हा कामगारांच्या जीवनाला संजीवणी प्राप्त करून द्यावी, ही मनापासुन विनंती. आम्हाला आपल्यावर पुर्णपणे विश्वास असल्यामुळे आमच्या गिरणी कामगारांचे दुःख या पत्राव्दारे आपणाकडे व्यक्त करीत आहोत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात फिनले मिल सुरू करून कामगारांना न्याय आणि हक्काचे आणि स्वाभिमानाचे जीवन जगण्यासाठी मदत करावी, अशी विनंती सुद्धा निवेदनातून करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *