अमरावती : विदेशी चलन दाखविण्‍याच्या बहाण्‍याने दारू विक्रेत्‍याला गंडविले, दीड लाख लंपास

अमरावती : आम्‍ही सिंगापूर येथून आलो आहोत, तुमच्‍याकडील जुनी शंभर रुपयांची नोट पहायची आहे, असे सांगून दोन भामट्यांनी दारू विक्रेत्‍या दुकानदाराला बोलण्‍यात गुंतवले आणि त्‍याच्‍या नकळत दुकानातील गल्‍ल्‍यातून १ लाख ४५ हजार रुपयांची रोकड लंपास केल्‍याची घटना शेंदूरजनाघाट पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीतील मलकापूर येथे घडली.

शुभम संजय जयस्‍वाल (२९, रा. मलकापूर) असे फसवणूक झालेल्‍या व्‍यावसायिकाचे नाव आहे. शुभम जयस्‍वाल यांचे मलकापूरच्‍या आठवडीबाजारात देशी दारू विक्रीचे दुकान आहे. रात्री ९ वाजताच्‍या सुमारास दोनजण त्‍यांच्‍या दुकानात आले. एकाने देशी दारूची बाटली विकत घेतली. शुभमला ५० रुपये दिले. दुसरा त्‍यावेळी दुकानातील अन्‍य व्‍यक्‍तीसोबत बोलत होता. तेवढ्यात पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेल्‍या एका भामट्याने मला तुमच्‍याकडील जुनी शंभर रुपयांची नोट पहायची आहे, आम्‍ही सिंगापूर येथून आलो आहोत, असे त्‍याने दुकानदाराला सांगितले. दोघेही काऊंटर ठेवलेल्‍या जागेत आले. त्‍यांनी विदेशी चलनातील एक नोट दुकानदाराला दाखवली. त्‍याला बोलण्‍यात गुंतवून ठेवले. यादरम्‍यान दुकानदाराने त्‍यांना पायातील बूट बाहेर काढण्‍यास सांगितले. थोड्या वेळाने ते घाईघाईने टोयाटो कंपनीच्‍या वाहनात बसून निघून गेले.

दुकान बंद केल्‍यानंतर दुकानदार शुभम यांनी जेव्‍हा दारू विक्रीचा हिशेब केला, तेव्‍हा गल्‍ल्‍यात १ लाख ४५ हजार रुपये कमी दिसले. दुकानात आलेल्‍या दोन अज्ञात आरोपींनी ते चोरून नेले, अशी तक्रार शुभम यांनी पोलिसांत दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *