आकांक्षित ब्लॉक कार्यक्रमांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संकल्प सप्ताहाचा शुभारंभ

धारणी येथील आदिवासी क्षेत्रातील नागरिकांची कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थिती

अमरावती, दि. 30 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत संकल्प सप्ताहाचा शुभारंभ भारत मंडपम, नवी दिल्ली येथे आज करण्यात आला. या कार्यक्रमाला अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील आदिवासी बांधव तसेच प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे दूरदृष्य प्रणालीव्दारे ऑनलाईन उपस्थित होते.

जिल्हाधिकारी सौरभ कटियार, जिल्हा परिषदचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा हे या कार्यक्रमाला प्रत्यक्ष नवी दिल्ली येथे उपस्थित होते. तर अमरावती येथून निती आयोगाचे आर. श्रवण, सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी रिचर्ड यान्थन, परिविक्षाधीन अधिकारी नरेश आकनुरी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, जिल्हा परिषद उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत म्हस्के, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी अरुण रणवीर, सहायक सूचना विज्ञान अधिकारी नरेंद्र फुलझेले, अमरावतीचे तहसीलदार विजय लोखंडे, धारणीचे गट विकास अधिकारी बाळासाहेब रायबोले आदी मान्यवर यावेळी या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज भारत मंडप, नवी दिल्ली येथे संकल्प सप्ताह कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. जम्मू काश्मीर , उत्तर प्रदेश तसेच मेघालय येथील नागरिकांशी पंतप्रधानांनी संवाद साधला. यावेळी आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत धारणी तालुक्यातील नागरिकांनी आभासी पध्दतीने या कार्यक्रमाचा लाभ घेतला. यावेळी सहभागी होणारे सर्व आदिवासी पुरुष, महिला व बालकांनी पारंपारिक वेशभूषा धारण केली होती. सामुदायिक आरोग्य अधिकारी, धारणी तालुक्यातील अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ता यावेळी उपस्थित होत्या.

पंतप्रधान नरेंद मोदी यांनी यावेळी ‘सबकी आकांक्षा, सबका विकास’ याचे महत्त्व विषद केले. प्रत्येक नागरिकाने आपल्या स्तरावरुन देशाच्या विकासासाठी योगदान द्यावे. समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकास पोहचविण्यासाठी आकांक्षित ब्लॉक कार्यक्रम महत्त्वपूर्ण आहे. ‘संकल्प ते सिध्दी’ हा मार्ग अनुसरुन समाजातील गरजू घटकांना मदत पोहचविण्याची जबाबदारी सर्वांची आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाकडून सामाजिक आणि आर्थिक मागास तालुक्यांच्या शाश्वत विकासासाठी आकांक्षित तालुका कार्यक्रम सुरु करण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

देशात 500 आकांक्षित ब्लॉक तयार झाले आहेत. विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाची भूमिका निभावेल. यामध्ये कृषी, आरोग्य, शिक्षण, अर्थ व सामाजिक कार्य मूलभूत पायाभूत सुविधा यांचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. देशातील दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आकांक्षित ब्लॉक कार्यक्रमाच्या माध्यमातून विकास पोहचविण्यासाठी शासन कटिबध्द आहे. समाजाच्या विकासासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. कोणत्याही योजनेच्या यशस्वीतेसाठी जनसहभाग खुप महत्त्वपूर्ण असतो. शासन आणि जनसहभागाच्या सहकार्याने येत्या वर्षभरात आश्वासित ब्लॉकच्या माध्यमातून प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहचण्याचा मानस पंतप्रधान श्री. मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.

देशातील 329 जिल्ह्यांमध्ये 500 आकांक्षित ब्लॉकमध्ये हा कार्यक्रम लागू केला आहे. संकल्प सप्ताह हा 500 आकांक्षित ब्लॉकमध्ये आयोजित केला जाईल. या सप्ताहाला 3 ऑक्टोबर पासून सुरुवात होऊन 9 ऑक्टोबर 2023 पर्यंत प्रत्येक दिवसाची एक विशिष्ट विकास थीम घेऊन आयोजित करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *